मुसळधार पाऊस, तरी टंचाईचे ढग

By Admin | Updated: July 16, 2014 03:36 IST2014-07-16T03:36:38+5:302014-07-16T03:36:38+5:30

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले असले तरी या रिपरिपीमुळे जेमतेम दोन ते तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे़

Heavy rain, though scarcity clouds | मुसळधार पाऊस, तरी टंचाईचे ढग

मुसळधार पाऊस, तरी टंचाईचे ढग

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले असले तरी या रिपरिपीमुळे जेमतेम दोन ते तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे़ ही वाढ नगण्य असून, पाण्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे़ त्यामुळे मुंबईवर पाणी टंचाईचे ढग कायम आहेत. पर्यायी जलस्रोत निर्माण करण्याचे पालिकेचे प्रयत्नही सपशेल फेल गेल्याने पाणीकपात २० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे़
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १३ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे़ मात्र अद्याप तलावांमध्ये ९९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे़ गतवर्षी जुलैच्या पंधरवड्यात तलावांमध्ये आठ लाख दशलक्ष लीटर साठा जमा झाला होता़ पावसाने अद्याप तलाव क्षेत्रात जोरही धरलेला नाही़ त्यामुळे मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे़
२ जुलै रोजी पालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती़ तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास ही कपात मागे घेण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले होते़ परंतु, आजच्या घडीला ३१ जुलैपर्यंतचा पाणीसाठा तलावांमध्ये असल्यामुळे आणखी १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव तयार होत आहे़ याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे़
मालाड पूर्व येथील पठाणवाडी भागात गेले काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ याबाबत पी उत्तर विभाग कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती़ परंतु अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कानावर हात ठेवले़ तर गेले आठवडाभर या ठिकाणी पाणीच बंद झाले़ यामुळे त्रस्त रहिवाशांनी याविरोधात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला दणका दिला़ सकाळी वर्दळीच्या वेळीच रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. (प्रतिनिधी)

Web Title: Heavy rain, though scarcity clouds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.