दमदार पावसाने सुखावला बळीराजा

By Admin | Updated: July 4, 2016 02:07 IST2016-07-04T02:07:40+5:302016-07-04T02:07:40+5:30

दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात दमदार पाऊस पडत असून, बळीराजा सुखावला आहे.

Heavy rain dried up; | दमदार पावसाने सुखावला बळीराजा

दमदार पावसाने सुखावला बळीराजा


तळेगाव दाभाडे : दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात दमदार पाऊस पडत असून, बळीराजा सुखावला आहे. अंगाची काहिली करणारी उष्णता झपाट्याने कमी झाल्याने सर्वसामान्य माणूसही खुशीत आहे. संततधार पावसाने ओढे - नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
तालुक्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. भाताची खाचरे भरून वाहू लागली आहेत. दमदार पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या पावसाने तालुक्यातील दुबार भात पेरणीचे संकट टळले आहे. संततधार पावसामुळे छत्र्या, रेनकोट कपाटातून बाहेर निघाले असून, या वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. त्यांना आता दिलासा मिळाला आहे. धूळवाफेवर भाताची पेरणी करण्यात आली होती. या पावसाने भातरोपांची चांगली उगवण होण्यास मदत होणार आहे. पावसाअभावी काही ठिकाणी पिवळ्या पडलेल्या भातरोपांना आता तरारी येणार आहे.
तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील पर्जन्यमान, काळी - कसदार पाणी धरून ठेवणारी जमीन व अनुकूल हवामान यामुळे तालुक्यातील भात हेच खरिपाचे मुख्य पीक आहे.
संततधार पाऊस दिवस - रात्र पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील पवना, इंद्रायणी, कुंडलिका, आंद्रा, सुधा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसाने काही ठिकाणच्या ताली फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी पावसाने काही काळ विश्रांती घेतली. मात्र, सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी पुन्हा बरसल्या. धुवाधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले. निवाऱ्याअभावी मेंढपाळांचे हाल झाले. पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने तळेगावातील आठवडे बाजारात तुरळक गर्दी होती. अनेक ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शिल्लक राहिला.
कार्ला परिसरात २४ तासांत १४३ मिमी पाऊस
कार्ला : शनिवारी साडेसात ते रविवारी सकाळी साडेसात या २४ तासांत १४३ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारीही दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत होती. कार्ला फाट्यावर रस्ता उंच करण्यात आला आहे. परंतु, कार्ला फाटा वगळता एकवीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आले होते. स्थानिकांसह पर्यटक व भाविकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागली. काहींची वाहने पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यातच बंद पडली. त्यामुळे पाण्यात उतरून पर्यटकांना वाहन पाण्यातून ढकलत काढावे लागत होते. या रस्त्याची ही समस्या दर वर्षीर्ची असून, प्रशासनाला एखादी घटना झाल्यावरच जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिकांसह पर्यटक व भाविक करत होते.
इंद्रायणी दुथडीभरुन
कामशेत : कामशेत परिसरात तीन दिवसांत पावसाचा चांगलाच जोर वाढला असून, शेतात व ठिकठिकाणी पाणी साचले आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहायला लागली असून, नदीवरील जुन्या पुलाला पाणी लागले आहे.
इंद्रायणी नदीचे पात्र काठोकाठ भरले आहे. वाहून आलेल्या जलपर्णी जुन्या पुलाच्या कठड्यांना अडकल्या आहेत. नाणे रोडच्या बाजूने असणाऱ्या मोऱ्या तुडुंब भरून वाहत आहेत.
२४ तास पावसाचा जोर असाच राहिल्यास नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरून नाणे रोडचा रस्ता पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
>भातलावणीस वेग : पर्यटकांना औत्सुक्य
शिवणे : पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून दमदार हजेरी लावल्याने शिवणे परिसरात शेतात पुुरेसे पाणी झाल्याने भातलावणीस वेग आहे. वर्षाविहारासाठी आलेले पर्यटक भातलावणीच्या ठिकाणी जाऊन माहिती घेताना दिसत आहेत.पावसाच्या विलंबामुळे काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती. हे शेतकरी सध्या रोपांना चांगल्या प्रकारे वाढविण्यासाठी खते मारण्याच्या तयारीत आहेत. काही शेतकरी रोजंदारीने भातलावणीला जात आहेत. दमदार पावसाने ओढे, नाले भरभरून वाहू लागल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
शनिवार, रविवार हे सुटीचे दिवस आल्याने वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पवन मावळात दाखल झाले आहेत. काही पर्यटक शेताच्या बांधावर जाऊन कुतूहलतेने भातलावणीचे काम पाहण्यासाठी आवर्जून थोडा वेळ काढतात. त्या वेळी शेतकऱ्यांसमवेत सेल्फी काढाण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. भातलावणीबद्दलचे विविध प्रश्न पर्यटक शेतकऱ्यांना विचारतात. त्या वेळी शेतकऱ्यांची उत्तरे ऐकून पर्यटक अचंबित होत असल्याचे दिसले. भर पावसात व गुडघाभर चिखलात काम करणे हे आमच्या कल्पनेच्याही पलीकडचे आहे, असे मत पर्यटक व्यक्त करत होते.

Web Title: Heavy rain dried up;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.