जामीन रद्द करण्यासाठी जीआरपीची रेल्वे न्यायालयात धाव प्रकरण
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे त्यांनी त्यांना २००८ मध्ये मिळालेल्या जामिनातील अटींच्या सूचनांचे उल्लंघन केले असून तो रद्द करावा आणि त्यांची सुटका करू नये, अशी मागणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे न्यायालयाकडे केली आहे. त्या प्रकरणाची गेल्या आठवड्यात सुनावणी होती. परंतु, ठाकरेंचे वकील राजन शिरोडकर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने पुढील मुदतवाढ हवी, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आला. त्यानुसार, रेल्वे न्यायालयाने पुन्हा २१ जून ही तारीख दिली असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली. तेव्हा रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय परीक्षार्थ्यांना कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्या प्रकरणावरून तत्कालीन लोहमार्ग पोलीस निरीक्षकांनी ठाकरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने ठाकरेंना तेव्हाच जामीन मंजूर करून काही अटी घातल्या होत्या. त्यात कोणत्याही प्रकारे जनतेत तेढ करणारे व्यक्त करण्यात येऊ नये, ही अट प्रामुख्याने घातली होती. त्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे तांबेंनी न्यायालयाला सांगितले़ यामुळे आता पुढे दिलेल्या तारखेला ठाकरे येतात का, याकडे सुरक्षा यंत्रणेचे लक्ष आहे.