रस्त्यांसह आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: January 21, 2017 03:02 IST2017-01-21T03:02:31+5:302017-01-21T03:02:31+5:30
मुंबई महापालिका निवडणुक जवळ येत आहे तसतसे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींच्या कामांचा पाढा वाचण्यात येत आहे.

रस्त्यांसह आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुक जवळ येत आहे तसतसे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींच्या कामांचा पाढा वाचण्यात येत आहे. प्रलंबित प्रश्नांवर नागरिक रोषाने बोलत असून, ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग १६६मध्ये आरोग्यासह रस्त्यांचा प्रश्न जैसे थे असल्याचा पाढा स्थानिकांनी वाचला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाडी अद्याप झालेली नाही. विशेषत: महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्यावर कार्यकर्त्यांचा भर आहे. स्थानिक स्तरावर राजकीय प्रवास भरभक्कम करणाऱ्या प्रत्येक संभाव्य उमेदवाराने आपआपल्या प्रभागात दावेदारी केली असून, संभाव्य उमेदवारांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे. ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग १६६मध्येही सध्या असेच चित्र असून, येथील अपुऱ्या नागरी सेवांवर स्थानिकांनी बोट ठेवले आहे.
मिठीलगतच्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील झोपडीधारकांच्या पुनर्वसनप्रश्नी रहिवासी अधिक आक्रमक झाले आहेत. बैलबाजार येथे आरोग्य केंद्र असले तरी येथे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. शीतल तलावाच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. वाडीया कॉलनीमधील चाळीत पुरेशा नागरी सेवा असल्या तरी गटातटामुळे चिखलफेक अधिकच वाढली आहे. बैलबाजार येथील रस्त्यांचा प्रश्न कित्येक वर्षांपासून रेंगाळला आहे. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता, हेच स्थानिकांना समजेनासे झाले आहे. कुर्ला डेपोलगतचा फुटपाथ भंगार विक्रेत्यांनी व्यापला आहे.
प्रभाग क्रमांक १६६मधील क्रांती नगर, संदेश नगर, वाडीया कॉलनी, किस्मत नगर, शांती नगर, शीतल तलाव, बैलबाजार आणि कुर्ला डेपो या परिसरातील नागरी समस्यांबाबत स्थानिकच अधिक आक्रमक आहेत.