बंद गोदामात आढळले अज्ञात व्यक्तीचे शिर
By Admin | Updated: January 2, 2017 22:55 IST2017-01-02T22:55:19+5:302017-01-02T22:55:19+5:30
कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शिर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली

बंद गोदामात आढळले अज्ञात व्यक्तीचे शिर
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 - कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शिर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे शिर वायरने (केबल) बांधून (लटकवून) ठेवले आहे, तर धड बेपत्ता आहे. शिराखाली खाली काही हाडंही पडून आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
कोराडी नाक्याजवळ हे गोदाम असून ते अनेक दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी काही जण गोदामाजवळ गेले. त्यातील एकाने बंद गोदामाच्या खिडकीतून डोकावले असता त्याला मानवी शिर लटकलेले दिसले. त्यामुळे घाबरून हे सर्व जण चौकाकडे पळत आले. नंतर सांगाड्याची वार्ता कर्णोपकर्णी सर्वत्र पोहोचली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती कळाल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कोराडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. मृताचे शिर वायरने बांधून वर लटकवले होते. त्याचे धड बेपत्ता होते. शिराच्या खाली काही हाड़ं पडली होती. केस वगळता शिर पुरते कुजलेले होते. त्यामुळे हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृताचे धड कुठेतरी पुरले किंवा फेकून दिले असावे, असा पोलिसांकडून अंदाज बांधण्यात आला.
खूप दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असावा, असाही संशय आहे. पोलिसांनी मृताचे शिर आणि हाडं ताब्यात घेऊन ती रुग्णालयात पाठविली. त्यानंतर ती फॉरेंसिकलाही पाठविली जाणार आहे. दरम्यान, केवळ शिर आणि खाली काही हाडे आढळल्याने हा नरबळीचाच प्रकार असावा, अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू झाली. मृत व्यक्तीने जर आत्महत्या केली असती तर त्याचे संपूर्ण शरीर तेथे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले असते, असा तर्क वजा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहेत. उंदराने मृतदेह कुरतडला असता तर तेथे सर्व रक्तमास पडले असते. गोदाम बंद असल्यामुळे अन्य प्राणी तेथे शिरण्याची आणि धड पळविण्याची शक्यता नाही. मृताचे शिर वगळता संपूर्ण धड बेपत्ता असल्याने आणि खाली केवळ हाडं पडली असल्याने हा नरबळीचाच प्रकार असल्याच्या शंकेला पोलिसांकडून आॅफ द रेकॉर्ड दुजोरा दिला जात आहे. पोलिसांनी यासंदर्भात स्पष्टपणे बोलण्याचे टाळले आहे.
मृत कोण, मारले कसे ?
ज्याचे शिर लटकवून ठेवण्यात आले, तो तरुण कोण आहे आणि त्याला मारणारे आरोपी कोण आहे, ते तूर्त अंधारात आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, खूप दिवसांपासून बंद असलेल्या गोदामात आरोपी शिरले कसे, असाही प्रश्न आहे. त्यांनी मृताची हत्या तेथेच केली आणि धड तेथून पळवून नेले की आधी हत्या केली आणि गोदामात नरबळीसाठी केला जातो, तसा पूजा विधी केला की काय, त्याबाबत कोराडी पोलिसांकडे वारंवार विचारणा करूनही माहिती मिळाली नाही. रात्री ९ वाजेपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा आहे, असे पोलीस ठाण्यातून सांगितले जात होते.