अण्णा हजारे यांचा शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा

By admin | Published: June 2, 2017 12:41 PM2017-06-02T12:41:25+5:302017-06-02T12:41:25+5:30

खाजगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्य येऊन तो आत्महत्या करतो आहे.

Hazare support Anna Hazare's agitation | अण्णा हजारे यांचा शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा

अण्णा हजारे यांचा शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
अहमदनगर/पारनेर, दि. 2-   शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खाजगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्य येऊन तो आत्महत्या करतो आहे. अनेक वर्षे सातत्याने हे सुरू आहे. पण सहन करण्यालाही काही सीमा असतात. जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, असे हजारे यांनी म्हटले आहे.
 
जेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या सहनशिलतेला दाद देत नसेल तेव्हा त्याला नाइलाजाने कायदा हातात घेण्याची वेळ येते. असे घडणे हे समाज, राज्य व राष्ट्र हिताचे नसते. त्यातून कधी कधी आपणच आपल्या हाताने आपलेच नुकसान करुन घेत असतो. कारण राष्ट्रीय संपत्ती ही आपलीच संपत्ती आहे. म्हणून अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आंदोलनकर्त्यांनी संयम ठेऊन शांततेने आंदोलन करणे आवश्यक आहे. तसेच शासनाने वेळीच विचार करून शेतकऱ्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी.
 
मी शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला आहे. शेती मालाला रास्त बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची कशी वाताहत होते ते मी लहानपणापासून माझ्या घरातच अनुभवले आहे. आम्ही आमच्या संस्थेतर्फे नुकतेच गेल्या दहा महिन्यात मिरची, शेवगा, काकडी यासारखी पिके घेतली. सुधारीत पद्धतीने सेंद्रीय शेती केली. पण शेतीमालाला भाव नसल्याने दीड लाख रुपये खर्च करुन प्रत्यक्षात पंचवीस हजार रुपये सुद्धा उत्पन्न मिळाले नाही. संस्था म्हणून आम्ही सहन केले. मात्र ज्या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज किंवा इतर लोकांचे कर्ज घेऊन शेती उत्पन्नासाठी खर्च केला आणि उत्पन्न मिळाले नाही किंवा मिळालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नाही तर अशा परिस्थितीत नैराश्यापोटी आत्महत्या करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहत नाही.
 
जे शेतकरी आंदोलनामध्ये उतरले आहेत त्यांना होणाऱ्या वेदनांची मला जाणीव आहे. म्हणूनच मी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भूमि अधिग्रहण बिलाच्या विरोधात दिल्लीत आंदोलने केली व सरकारला ते बील मागे घ्यावे लागले. आंदोलन करताना कुठेही हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने शांततापूर्ण आंदोलन व्हावे असे वाटते. मी गेली पस्तीस वर्षे समाजहितासाठी वेगवेगळी शांततापूर्ण व अहिंसक आंदोलने करीत आलो आहे. म्हणून सरकारला ती आंदोलने मोडून काढता आली नाहीत. याउलट आंदोलनामुळे त्यांना समाजहिताचे निर्णय घ्यावे लागले आहेत.
या आंदोलना संबंधाने काही कार्यकर्ते दोन वेळा माझ्याकडे आले होते. या कार्यकर्त्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेल्या आहेत. अहिंसेच्या मार्गाने घटना, कायदे, नियम या सर्व गोष्टींचा विचार करुन आंदोलनाची प्रदीर्घ कालावधीसाठी दिशा ठरवून आंदोलन होणे आवश्यक वाटते. मी या आंदोलनाशी सहमत आहे. कारण अशी आंदोलने करणे घटनेने जनतेला दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्याचप्रमाणे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझी दोन वेळा यासंबंधी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनी आश्वासन दिले असून ते चर्चेला तयार आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा याची चर्चा करता येऊ शकेल. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदर बैठकीसाठी उपस्थित राहू शकेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी पुढील काळात राजकारण विरहित प्रदीर्घ आंदोलनाची दिशा ठरवीणे आवश्यक वाटते.

Web Title: Hazare support Anna Hazare's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.