हवालदार प्रल्हाद पाटील बडतर्फ
By Admin | Updated: November 19, 2015 01:51 IST2015-11-19T01:51:10+5:302015-11-19T01:51:10+5:30
खालापूर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणारा पोलीस हवालदार प्रल्हाद पाटील याने आपला सहकारी पोलीस शिपाई नीतेश पाटील यांच्या मोटारसायकलला स्फोटके लावून

हवालदार प्रल्हाद पाटील बडतर्फ
अलिबाग : खालापूर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणारा पोलीस हवालदार प्रल्हाद पाटील याने आपला सहकारी पोलीस शिपाई नीतेश पाटील यांच्या मोटारसायकलला स्फोटके लावून, येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातच त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. पाटील याला सेवेत ठेवल्यास तो घातक ठरेल. त्यामुळे त्याला बडतर्फ केल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी दिली आहे.
या हत्याकांडामागे अनैतिक संबंध हे कारण असल्याचेही निष्पन्न झाले आहे. २८ आॅक्टोबरला सकाळी ११.३०च्या सुमारास ही घटना रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातच असलेल्या दारुगोळा कोठाराच्या शेजारीच घडली. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी तत्काळ तैनात केलेल्या शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांत या प्रकरणाचा छडा लावून वस्तुस्थिती समोर आणली.
स्फोटात पोलीस शिपाई
नीतेश पाटील हे गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले महाड एमआयडीसी पोलीस
ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई
आर. टी. नागे हे देखील जखमी झाले होते. या प्रकरणी अलिबाग
पोलीस ठाण्यात स्फोटक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)