हर्षवर्धन जाधव पोहचले सोनेगाव ठाण्यात
By Admin | Updated: December 21, 2014 00:14 IST2014-12-21T00:14:24+5:302014-12-21T00:14:24+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. दुपारी १२ ते २

हर्षवर्धन जाधव पोहचले सोनेगाव ठाण्यात
बयाण नोंदविले : कानशिलात लगावल्याचा इन्कार
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. दुपारी १२ ते २ असे दोन तास आ. जाधव यांनी ठाण्यात आपले बयाण नोंदविले.
हॉटेल प्राईडमध्ये बुधवारी सायंकाळी पो.नि. पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्यामुळे आ. जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, आ. जाधव यांनी कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला. त्यामुळे पोलीस त्यांना अटक करू शकले नाही. कोर्टाच्या आदेशानुसार, आज दुपारी १२ वाजता आ. जाधव आपल्या वकिलांसह सोनेगाव ठाण्यात पोहचले. ठाणेदार प्रकाश शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. जाधव यांचे बयाण नोंदवून घेतले. माहिती कळताच एसीपी दंदाळे, एसीपी मनवरे यांनीही पोलीस ठाणे गाठले. एसीपी मनवरे यांनीही नंतर आ. जाधव यांची बाजू ऐकून घेतली. आ. जाधव यांनी आपले बयाण नोंदविताना अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याचाही आ. जाधव यांनी स्पष्ट इन्कार केला, असे पोलीस सांगत आहेत. (प्रतिनिधी)
आज पुन्हा हजेरी
बयाण नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी आ. जाधव यांना पुन्हा रविवारी दुपारी ठाण्यात येण्यास सांगितले. पोलिसांना मिळालेली तक्रार आणि साक्षीपुराव्याच्या अहवालावरून पोलीस उद्या (रविवारी) आ. जाधव यांचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ करणार आहेत. त्यावरून तयार केलेला अहवाल पोलीस २९ डिसेंबरला कोर्टात सादर करतील.
प्रसारमाध्यमासमोर चुप्पी
दुपारी २ वाजता आ. जाधव पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांनी चुप्पी साधली. कोणत्याच प्रश्नावर ते काहीही बोलले नाही. दरम्यान, त्याच्या वकिलांनी ‘कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही पोलीस ठाण्यात आलो होतो’, असे सांगितले.