भेदरलेल्या इवल्या डोळ्यांत सामावेना हर्ष!
By Admin | Updated: November 14, 2014 23:19 IST2014-11-14T22:31:16+5:302014-11-14T23:19:56+5:30
शाब्बास सातारकर : झोपडी-पालातल्या उघड्या मुलांना ऊब देऊन खऱ्या अर्थानं साजरा केला बालदिन---इनिशिएटिव्ह

भेदरलेल्या इवल्या डोळ्यांत सामावेना हर्ष!
सातारा : पालासमोर अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं आलेली माणसं पाहून आता झोपड्या हटवणार की काय, या भीतीनं त्यांचे चेहरे भेदरले. आलेल्या माणसांनी भल्या मोठ्या पिशव्यांमधून रंगबिरंगी कपडे बाहेर काढायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दाटलं... आणि जेव्हा त्याच कपड्यांनी ऐन थंडीत त्यांच्या उघड्या अंगाला ऊब दिली, तेव्हा ते आनंदानं नाचू लागले. त्यांच्यासाठी थंडी इतकी रंगीत कधीच नव्हती....
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा बालदिन खऱ्या अर्थानं साजरा केला तो सातारकरांनी. झोपड्यांत राहणाऱ्या, भर थंडीत उघड्या अंगानं फिरणाऱ्या चिमुकल्यांना गरम कपडे देण्याच्या ‘लोकमत’च्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सातारकरांनी अक्षरश: कपड्यांचा डोंगर उभा केला. या कपड्यांचं वाटप करण्याच्या कामाला बालदिनाच्या निमित्तानं सुरुवात झाली. कपडे देऊ इच्छिणाऱ्यांकडून ते गोळा करणं आणि प्रत्यक्षात त्यांचं वाटप करण्यासाठी अनेक तरुण हिरीरीनं या मोहिमेत स्वयंस्फूर्तीनं उतरले आहेत.
थंडी वाढत चालली असतानाच ऐन नोव्हेबर महिन्यात शुक्रवारी सकाळी अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गोडोली नाक्याजवळ गोरगरीब कष्टकऱ्यांनी बांबूच्या सांगाड्यावर फाटकी धडुतं टाकून तयार केलेली पालं चिंब भिजलेली. पोरं-सोरं परिसरातल्या ओल्या मातीत फिरत, खेळत होती. रस्त्यावर अचानक काही चारचाकी, काही दुचाकी वाहनं थांबली आणि त्यातली माणसं थेट वस्तीच्या दिशेनं येऊ लागली, तेव्हा पोरं भांबावली. बायाबापड्याही भुवया उंचावून, भेदरून पाहू लागल्या. वस्तीत आलेल्या तरुणांच्या हातात मोठमोठ्या पिशव्या आणि गाठोडी होती. सातारकरांनी दिलेले ऊबदार कपडे त्या पिशव्यांमधून बाहेर पडू लागले आणि तरुणांनी ते पोरांना वाटायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. ऐन थंडीत कपडे वाटणारे तरुण देवदूत भासू लागले आणि पोरांचे डोळे चमकले.
अंगावरचे अर्धंमुर्धं शरीर झाकणारे कपडे उतरवून बच्चेकंपनीनं झटपट नवे कपडे चढवले. रॉकेलचा कॅन, रंगाचे रिकामे डबे... जे सापडेल ते बडवत पोरं आनंदानं नाचू लागली. ‘लोकमत’च्या टीमबरोबर असलेले कार्यकर्ते प्रत्येक पोराला बोलावून उपलब्ध असलेल्या कपड्यांमधून त्याच्या मापाचे कपडे त्याला काढून देत होती. प्रत्येकाला दोन ड्रेस मिळाल्यानं पोरांचा आनंद द्विगुणित झाला. जर्किन, वेगवेगळ््या फॅशनचे स्वेटर, टी-शर्ट, बर्म्युडा हे प्रकार पोरं प्रथमच पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तरुण कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान उतू जात होतं.
सुमारे पंधरा पालं असलेल्या या वस्तीत तीन पालं गोसावी समाजाची आणि उरलेली बारा-चौदा पालं नागपूर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी गोंड समाजाची. पंधरा वर्षं याच ठिकाणी तळ ठोकून राहिलेली ही कष्टाळू माणसं. लोकांचे कान साफ करून देणं आणि मोलमजुरी हे त्यांचे व्यवसाय. तुटपुंज्या आमदनीतून रोजची चूलच कशीबशी पेटते, तिथं पोरांना थंडीसाठी गरम कपडे ही मंडळी आणणार कुठून? कळकटलेले, फाटके कपडे घातलेले स्त्री-पुरुष पोरांना अचानक मिळालेल्या मायेनं हरखून गेलेले. कार्यकर्त्यांना दोन्ही हातांनी भरभरून दुवा देत या मंडळींनी ओलावलेले डोळे पुसले.
‘लोकमत’ची टीम त्यानंतर पोहोचली महामार्गालगत अजंठा चौकात असलेल्या झोपडपट्टीत. १९७२ मध्ये वसलेली ही वस्ती अनेकदा जागेवरून हलली आहे. इथून उठवलं की तिथं सरकून झोपड्या टाकायच्या, असं करत ही कुटुंबं आयुष्य वेचतायत. डबेवाले, गोपाळ समाज आणि बौद्ध समाजाची घरं या वस्तीत आहेत. जवळच्या खडीमशीनवर पुरुषमाणसं काम करायची. आता मशीन बंद झाल्यामुळं मिळेल ते काम करून जगणाऱ्या या कुटुंबांमधील कुणाला काही कल्पना नसताना तरुण एकेका घरात जाऊन मुलांना बाहेर बोलावू लागले.
कार्यकर्त्यांंच्या पिशव्यांमधून कपडे बाहेर पडू लागेपर्यंत लहानथोर कुणालाच काही समजत नव्हतं. त्यामुळं सर्वांचे चेहरे बावरलेले. पण मापं घेऊन कपडे वाटायला सुरुवात झाल्यावर या मुलांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य फुललं. (प्रतिनिधी)
तरुण कार्यकर्त्यांची कौतुकास्पद कामगिरी
‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार ज्या कुटुंबांनी झोपडीतल्या मुलांना कपडे देण्याची तयारी दर्शविली आहे, त्यांच्या घरातून कपडे गोळा करून ते प्रत्यक्ष मुलांपर्यंत पोहोचविण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम तरुण कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं करीत आहेत. वाऱ्या-पावसाची पर्वा न करता हे तरुण शहरातून अविश्रांत फिरत आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या गोरगरीब मुलांना ऊब देण्याइतके कपडे जमा होतील का, हा प्रश्न सुरुवातीला होता; मात्र आता कपड्यांची अक्षरश: रास लागली आहे आणि त्यात या तरुण कार्यकर्त्यांचे श्रम लाखमोलाचे आहेत.
‘नवलाईचा आनंद
लोकमत’ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत कऱ्हाड शहरासह परिसरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
शुक्रवारी कऱ्हाडातील उमेश रमेशराव चव्हाण यांच्यासह अनेक नागरिकांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात येऊन मुलांसाठी कपडे भेट दिले.
झोपड्यांमध्ये कपड्यांविना थंडीने कुडकुडणाऱ्या २ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना हे कपडे देण्यात येणार आहेत.
अचानक आलेल्या पाहुण्यांना पाहून कावरेबावरे झालेले लहानगे जीव जेव्हा रंगबिरंगी कपडे घालून सजले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.