अर्ध्यावर संपली झुंज!

By Admin | Updated: November 25, 2014 00:56 IST2014-11-25T00:56:38+5:302014-11-25T00:56:38+5:30

आपण शिकलो, मोठे झालो पण आपला समाज मात्र अजूनही उपेक्षेचेच चटके सोसतोय, हे थांबले पाहिजे़ आपल्या समाजबांधवांनाही त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजे, यासाठी संघटनेची मूठ बांधून

Hang on halfway! | अर्ध्यावर संपली झुंज!

अर्ध्यावर संपली झुंज!

विजया बोडे यांचा अपघाती मृत्यू : धनगर समाज संघटनेचा प्राणवायूच हिरावला
नागपूर : आपण शिकलो, मोठे झालो पण आपला समाज मात्र अजूनही उपेक्षेचेच चटके सोसतोय, हे थांबले पाहिजे़ आपल्या समाजबांधवांनाही त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजे, यासाठी संघटनेची मूठ बांधून शासनाशी झुंज देणाऱ्या अ‍ॅड़ विजया बोडे नावाच्या वादळाला अखेर काळानेच शांत केले़ सोमवारी दुपारी लॉ कॉलेज चौकातून जात असताना एका स्कूल बसने विजया बोडे यांच्या दुचाकीला धडक दिली अन् एका झुंझार कार्यकर्तीचा अकाली मृत्यू झाला़
अ‍ॅड़ विजया विवेक बोडे या धनगर समाज महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होत्या़ नागपुरातील रमणा मारोती परिसरात त्यांचे घर आहे़ या घराने धनगर समाज संघटनेतील अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत़
सातत्याने संघर्ष करत जगणाऱ्या आपल्या समाजालाही शिक्षण, नोकरीचा हक्काचा वाटा मिळावा व त्यासाठी आधी आरक्षणाची तरतूद व्हावी, यासाठी विजयाताई संघटनेच्या माध्यमातून शासनाशी लढा देत होत्या़ आपली बाजू देशाच्या राज्यकर्त्यांना पटवून देण्यासाठी १० संघटनांचे एक शिष्टमंडळ दिल्ली दरबारी गेले होते़ त्यात विजयातार्इंचा उल्लेखनीय सहभाग होता़
निव्वळ रस्त्यावरची लढाई लढून उपयोग नाही़ आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर आधी आपल्या समाजातील पांढरपेशा वर्गाला एकत्र आणावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणूनच त्यांनी स्वत: पुढकार घेऊन धनगर समाजातील वकिलांची एक मोठी फळी उभी केली़
स्वत: एम़ एस्सी़ अ‍ॅग्रीकल्चर असूनही व बक्कळ पगाराची नोकरी मिळत असूनही ती नाकारून केवळ समाजाच्या हितासाठी लढा द्यायला त्यांनी कायद्याचे शस्त्र हाती घेतले व वकिलीकडे वळल्या़ अन्याय, अत्याचाराने पिळलेल्या हताश-निराश जीवांसाठी त्या मोठ्याच आधार होत्या़
समाजासाठी लढल्या
मागच्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या मोर्चाचे नेतृत्व करीत त्यांनी विधिमंडळावर धडक दिली होती़ या समाजातील लक्षावधी बांधवांना विजयातार्इंचा मोठा आधार होता़ परंतु काळाने अकाली घाला घातला आणि समाजाला लाभलेला भक्कम आधार एका क्षणात नाहीसा झाला़ त्यांच्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कॉलेजची परीक्षा अन् काळाचीही
विजयातार्इंचे पती विवेक बोडे हे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रोखपाल आहेत़ त्यांना अंकुश आणि अंकुर नावाची दोन जुळी मुलं आहेत़ यातील अंकुरची परीक्षा सुरू आहे़ तो बी़ई़च्या अंतिम वर्षाला आहे़ आज पेपर सोडवून घरी परतातच त्याला वडिलांनी आईचा अपघात झाल्याची बातमी दिली व घटनास्थळावर जाण्यास सांगितले़ तो तिथे पोहोचला पण, तोपर्यंत सारेकाही संपले होते़ कॉलेजची परीक्षा सुरू असतानाच काळानेही अंकुरची मोठीच परीक्षा घेतली़ हे दोघेही भाऊ आईच्या अशा अकाली जाण्याने प्रचंड हादरले आहेत़ विजया तार्इंचे पती विवेक बोडे यांचीही स्थिती याहून वेगळी नाही़
असा झाला अपघात
दुचाकीने निघालेल्या अ‍ॅड. विजया विवेक बोडे (वय ४२) भरधाव स्कूलबसने चिरडले. आज दुपारी ३.२५ च्या सुमारास लॉ कॉलेज चौकाजवळ हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा आणि न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या अ‍ॅड. बोडे आज दुपारी आपल्या अ‍ॅव्हीएटर स्कूटरने (एमएच ३१/ सीव्ही ७०२५) रविनगर चौकाकडे जात होत्या. लॉ कॉलेज चौकातून वळण घेत त्या रविनगर चौकाकडे निघाल्या. त्याचवेळी सिग्नल सुटल्यामुळे रविनगर चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी भरधाव वाहने दामटली. बाजूने जाणाऱ्या एका वाहनाचा अ‍ॅड. बोडे यांना धक्का बसला. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने त्या स्कुटरसह खाली पडल्या आणि दिल्ली पब्लिक स्कूलच्या बसने (एमएच ४०/ वाय ७१३१) अ‍ॅड बोडे यांना चिरडले. मागचे चाक शरीरावरून गेल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या.
बस चालकाला अटक
आरोपी चालक बससह घटनास्थळावरून पळून गेला होता. वर्दळीचा मार्ग त्यात दुपारची वेळ असल्यामुळे घटनास्थळी अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. काही उत्साही बघ्यांनी वाहतुकीलाही अडसर निर्माण केला. प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने दिलेल्या माहितीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी बसचालकाची माहिती काढली. ईश्वर बाळकृष्ण निखार (वय ५०) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला रात्री अटक केली.
बेशिस्त वाहतुकीचा बळी
अ‍ॅड. बोडे यांच्याशी संबंधित सूत्रांनुसार, त्या कोर्टात नेहमीच कारने यायच्या. आज मात्र काय झाले, कळायला मार्ग नाही. त्या कारऐवजी दुचाकीने आल्या अन् काळाने डाव साधला. भरधाव बसने त्यांना चिरडले. अ‍ॅड. बोडे यांचा बळी बेशिस्त वाहतुकीमुळेच गेला. उपराजधानीतील चौकाचौकात बेशिस्त वाहतुकीची संतापजनक उदाहरणे दिवसभर बघायला मिळतात. तरुण, तरुणीच नव्हे तर महिला, पुरुष वाहनधारकही बेदरकारपणे सिग्नल तोडताना दिसतात. अनेकदा या बेशिस्त वाहनचालकांचा फटका निर्दोष व्यक्तीला बसतो. कुणाचा जीव जातो तर, कुणाला जीवघेणी दुखापत होते.
वाहतूक पोलिसांचा दोष
उपराजधानीच्या बेशिस्त वाहतुकीला वाहनचालकांप्रमाणेच पोलीसही कारणीभूत आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांचा अजिबात धाक नाही. चौकात (सिग्नलपासून दूर झाडाच्या आडोशाला) पोलीस असतात. वाहनचालकांनी सिग्नल तोडून समोर यावे आणि कारवाईचा धाक दाखवून त्याचा खिसा हलका करता यावा, यासाठीच ते सिग्नलपासून दूर उभे असतात की काय, अशी शंका येते. ते आडोशाला असल्यामुळे बेशिस्त वाहनचालकाला दिसत नाही. त्यामुळे सिग्नल सुरू असताना तो वाहन दामटतो. अनेकदा तो तर निघून जातो, तो मध्ये आल्यामुळे दुसऱ्याला अपघात होतो. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्यास आणि बेशिस्त वाहनचालकांमध्ये धाक निर्माण केल्यास जीवघेणे अपघात रोखण्यात यश मिळू शकते.

Web Title: Hang on halfway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.