हंडीला नियमांचे बंधन
By Admin | Updated: August 16, 2014 02:42 IST2014-08-16T02:42:09+5:302014-08-16T02:42:09+5:30
गेल्या दीड महिन्यापासून दहीहंडी उत्सवावर असलेले वादाचे सावट दूर झाल्याने गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे

हंडीला नियमांचे बंधन
मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून दहीहंडी उत्सवावर असलेले वादाचे सावट दूर झाल्याने गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बालहक्क आयोगाकडून आलेले निर्देश मात्र कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीवर पोलिसांसह सामाजिक संस्था आणि सजग नागरिकांची बारीक नजर असेल, हे स्पष्टच आहे.
बालहक्क आयोगाच्या निर्देशांचे पालन करणे हे गोविंदा पथकांसह आयोजकांसमोरचेही मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे दहीहंडीचा लौकिक आणि परंपरा राखताना जिवाचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी पथकांसह आयोजकांवर आलेली आहे.
बालहक्क संंरक्षण आयोगाने दिलेल्या निर्देशांमुळे गोविंदा पथकांची तारांबळच उडाली होती. त्यात हायकोर्टाने तर १८ वर्षांखालील गोविंदांवर बंदी घालून गोची केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांची मर्यादा हटवली आणि उंचीची अट काढली. त्यामुळे गोविंदा पथकांच्या सदस्यांचा जीव भांड्यात पडला. पण १२ वर्षांखालील गोविंदांसंदर्भातील निर्देश मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. त्याचबरोबर बालहक्क आयोगाचे सुरक्षेसंदर्भातले अन्य निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. त्यामुळे गोविंदा पथकांना सर्वोच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळालेला असला, तरी त्यांची खरी कसोटी मात्र यापुढे आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेल्या निर्देशांचे पालन गोविंदा पथकांना आणि आयोजकांना काटेकोरपणे करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)