पूर हाताळण्यास पालिकेची यंत्रणा तोकडीच..!

By Admin | Updated: August 5, 2016 00:30 IST2016-08-05T00:30:05+5:302016-08-05T00:30:05+5:30

चार-दोन वीजपंप, दोन चालविता न येणाऱ्या बोटी, काही दोरखंड व कर्मचारी आणि इतक्याच आधारावर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग बुधवारच्या पुरात कार्यरत होता.

To handle the floods, the machinery of the school! | पूर हाताळण्यास पालिकेची यंत्रणा तोकडीच..!

पूर हाताळण्यास पालिकेची यंत्रणा तोकडीच..!


पुणे : इमारतीत शिरलेले पाणी खेचण्यासाठी चार-दोन वीजपंप, दोन चालविता न येणाऱ्या बोटी, काही दोरखंड व कर्मचारी आणि इतक्याच आधारावर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग बुधवारच्या पुरात कार्यरत होता.
सुदैवाने काही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही, पाऊसही थांबला; मात्र तो वाढला असता, धरणातून आणखी वेगात पाणी सोडले असते, तर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावरच आपत्ती ओढवली असती, अशी स्थिती होती. या विभागाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या कोणत्याही अत्याधुनिक साधनसुविधा नाहीत. पालिका प्रशासन या विषयाला गंभीरपणे घेत नसल्याचा पुरावा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुखाकडे त्या विभागाव्यतिरिक्त आणखी एका विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अतिशय तोकड्या साधनसुविधांच्या साह्याने या विभागाला काम करावे लागत आहे. विविध विभागांशी संपर्क साधून त्यांचे साह्य घेऊन बुधवारच्या पुराचा दिवस या विभागाने
कसा तरी निभावला. (प्रतिनिधी)
>सिंहगड रस्त्यावरच्या नदीकाठालगतच्या वसाहती, मंगळवार पेठेतील नदीलगतची झोपडपट्टी, तसेच नदीच्या पाण्याखाली गेलेला भिडे पूल या तीन ठिकाणी बुधवारी सर्वाधिक गंभीर परिस्थिती होती. धरणातून पाणी सोडणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला बुधवारी सकाळी मिळाली. त्यानंतर त्यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरुवात केली. नदीकाठालगतच्या रहिवाशांना सूचना देण्यात आल्या.एनडीआरएफची एक टीम तयार ठेवण्यात आली. अग्निशामक दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांना माहिती देण्यात आली. पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली, तर निवाऱ्यासाठी शाळांची व्यवस्था करण्यात आली. महसूल विभाग, वीजवितरण कंपनी, मोटार वाहन विभाग यांनाही पुराच्या पाण्याची माहिती देऊन सज्ज राहण्यास
सांगण्यात आले. पाणी शिरलेल्या इमारतींमधील पाणी वीजपंपाने खेचून काढण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर थोडा कमी झाला. गुरुवारी सकाळी पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. वरिष्ठांना माहिती देण्यातच मग्न असलेला आपत्ती व्यवस्थापन विभागही मग थंडावला.

Web Title: To handle the floods, the machinery of the school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.