"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:36 IST2025-10-29T18:33:54+5:302025-10-29T18:36:46+5:30
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तुमच्यात दम असेल निवडणूक रोखून दाखवा असं आव्हान सदावर्ते यांनी दिले आहे.

"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
मुंबई - हा सत्याचा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल. हा लबाडांचा आणि बहुरूपींचा मोर्चा आहे. फसवा-फसवीचा मोर्चा आहे. इतरांना जे कायदे लागू आहेत, तेच नियम शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाला असले पाहिजेत असं सांगत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली आहे. १ नोव्हेंबरला विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील घोळाविरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यावरून सदावर्ते यांनी आज डीसीपींची भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं की, कुणीही कायद्यापेक्षा मोठे नाही. उच्च न्यायालयाने आझाद मैदान मोर्चासाठी ठरवून दिले आहे. त्याव्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणाहून मोर्चा काढता येणार नाही. जर कायद्याचा भंग कुणी करणार असेल तर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी आम्ही झोन वनचे डीसीपी, मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली आहे. शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत. राज ठाकरेंचे इकडे तिकडे सुरू असते. निवडणूक आयोगावर मोर्चा नेता येत नाही. याविरोधात मोर्चा काढायची परवानगी कुणालाच नाही, संविधानाने त्यांना घटनात्मक दर्जा दिला आहे. कायद्याचा भंग करता येत नाही. असा मोर्चा कायद्याने काढता येत नाही हे शरद पवारांना सूचत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच तुमच्यात निवडणूक लढण्याची ताकद नाही. त्यामुळे तुम्ही सगळे आव आणत आहात. जनता मायबाप आहे. स्थानिक निवडणुका घ्याव्यात म्हणून हे सगळे बोंबलत होते. सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तुमच्यात दम असेल निवडणूक रोखून दाखवा. लोकप्रतिनिधी नसल्याने महापालिकेचे कामकाज होत नाही. ठाकरे बंधूंनी हातात हात घातले तरीही ते रिकामे येणार आहेत. उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ होणार आहे. कोविडमधील जुन्या केसेस बाहेर येतील म्हणून निवडणूक नको म्हणत आहेत. कायद्यापेक्षा हे मोठे नाही. हा मोर्चा भुकेसाठी नाही, ओला दुष्काळासाठी नाही. हे दळभद्री, उद्या निवडणुकीत हरणार आहेत. त्यांची राख होणार आहे म्हणून मोर्चा काढत आहेत असं संतप्त प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली.
दरम्यान, मोर्चा काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. मोर्चे ठरलेल्या ठिकाणीच होऊ शकतात हे हायकोर्टाने सांगितले आहे. असंविधानिक, बेकायदेशीर मोर्चा काढू देऊ नये. आझाद मैदानाबाहेर जर हे मोर्चा काढत असतील तर त्यांच्या कायदेशीर मुसक्या बांधा अशी मागणी आम्ही केली आहे. निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढता येतो का त्याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे असंही गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केली आहे.