"आता राज ठाकरे यांची सटकली का? हेच जर एकाद्या मुस्लीम व्यक्तीकडून घडलं असतं तर...!" गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 19:22 IST2025-03-09T19:22:05+5:302025-03-09T19:22:24+5:30
गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला.

"आता राज ठाकरे यांची सटकली का? हेच जर एकाद्या मुस्लीम व्यक्तीकडून घडलं असतं तर...!" गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९वा वर्धापन दिवस आज रविवारी पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या पाण्यासंदर्भात भाष्य केले. "बाळा नांदगावकर माझ्यासाठी गंगेचे पाणी घेऊन आले होते. पण, मी म्हणालो हड, मी नाही पिणार. पूर्वीच्या काळी ठीक होतं. आता सोशल मीडियावर बघितलं. लोक त्यात अंग घासून अंघोळ करताहेत. कोण पिणार ते पाणी? डोकी हलवा, जरा अंधश्रद्धेतून बाहेर या", असे म्हणत, राज ठाकरे यांनी गंगेतील दूषित पाण्यासंदर्भात भाष्य केले. यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला.
काय म्हणाले सदावर्ते? -
राज ठाकरे यांच्या विधानावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "मला असे वाटते की, आता राज ठाकरे यांना जहीर करावे लागेल की, त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांन जाऊन विचारायला हवे, जे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर टीका करत असतात त्यांनी. त्यांनी आता स्वतःच विचार करायला हवा की, राज ठाकरे यांची भूमिका, आता कशा प्रकारची आहे? कारण राज ठाकरे यांना श्रद्धा हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार समजत नसेल, त्यातल्या त्यात, या देशात, या राज्यात, बहुसंख्य हिंदू आहेत आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी संविधानाने संरक्षण दिले आहे. असे असताना, गंगा हा विषय एका अस्थेसोबत जोडला गेला आहे. त्या एकूण गंगांचाही त्यांनी अपमान केला आहे." सदावर्ते टीव्ही९ सोबत बोलत होते.
"राज ठाकरे तीर्थ पिण्याची सक्ती नाही, पण..." -
सदावर्ते पुढे म्हणाले, "याच बरोबर, बाळा नांदगावकर यांच्यासारख्या व्यक्तींने अत्यंत श्रद्धेने जर गंगा मातेचे तीर्थ आणलेले असेल आणि त्या तीर्थाची अवहेलना, त्या तीर्थाची हेटाळणी, स्वतःच्या आयुष्यातही केली, ठेवरे तिकडे, मी नाही पिणार म्हणून. राज ठाकरे पिण्याची सक्ती नाही. परंतु सार्वजनिक जीवनात कसे वागावे, कसे वर्तन करावे, इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, हे बघायला हवे."
"आता राज ठाकरे यांची सटकली का?" -
"ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, हे लक्षात घ्यायला हवे राज ठाकरे," असेही सदावर्ते म्हणाले. तसेच, "आता राज ठाकरे यांची सटकली का?" असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला.