जनआरोग्यमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:58 AM2023-06-21T07:58:09+5:302023-06-21T07:58:37+5:30

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी शासनाकडून करण्याबाबत सह्याद्री विश्रामगृहात शनिवारी बैठक झाली होती.

Guidelines for inclusion of senior citizens in public health | जनआरोग्यमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्याचे निर्देश

जनआरोग्यमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्याचे निर्देश

googlenewsNext

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमधून मोफत उपचार मिळावेत, यासाठी योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये सर्व ज्येष्ठांचा समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी शासनाकडून करण्याबाबत सह्याद्री विश्रामगृहात शनिवारी बैठक झाली होती. त्यात करण्यात आलेल्या अनेक सूचनांमुळे ज्येष्ठांना दिलासा मिळणार आहे. 
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, राज्य कामगार विमा रुग्णालय, महापालिका, नगरपालिका अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये त्या-त्या परिसरातील सर्व ६० वर्षांवरील नागरिकांची दोन वेळा मोफत तपासणी करावी. यासाठी ज्येष्ठांना आभा कार्ड देण्यात येऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालयातही सेवा उपलब्ध करून द्याव्यात. 
तसेच जनआरोग्य योजनेमधील अटी शिथिल करून सर्व ज्येष्ठांचा समावेश करावा. तसेच राज्यातील ज्येष्ठांची दीड कोटी संख्या लक्षात घेता सर्व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांच्या तपासणीसाठी दोन दिवस राखीव ठेवण्यात यावेत. तसेच पॅलेटिव्ह केअर वॉर्डाची टप्प्याटप्प्याने वाढ करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. 

प्रत्येक पोलिस ठाण्यात सहायता कक्ष
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिक संघटनेतील एकाला अध्यक्ष करून एक समिती गठीत करावी. ठाण्यात सहाय्यता कक्ष स्थापन करावा, त्याचे परिपत्रक काढावे, ज्येष्ठ नागरिक धोरणांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची निर्मिती करण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचनाही बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. 

सुमारे ९१ टक्के लोक निवृत्ती वेतनाबाहेर आहेत. त्या सर्वांनाच जनआरोग्याचा लाभ मिळाल्यास मोठा आधार मिळेल. तसेच पोलिसांच्या सहाय्यता केंद्रामुळे सुरक्षेचा प्रश्न सुटेल.   
- अण्णासाहेब टेकाळे, 
राज्य उपाध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ

Web Title: Guidelines for inclusion of senior citizens in public health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.