पाच महसुली जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भाजपाकडे

By Admin | Updated: December 27, 2014 04:57 IST2014-12-27T04:57:06+5:302014-12-27T04:57:06+5:30

राज्यातल्या सहापैकी पाच महसुली जिल्ह्यांसह एकूण २४ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भारतीय जनता पार्टीने स्वत:कडे ठेवले असून, शिवसेनेला मुंबई शहरासह १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले

The Guardian Minister of five revenue districts, BJP | पाच महसुली जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भाजपाकडे

पाच महसुली जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भाजपाकडे

अतुल कुलकर्णी, मुंबई
राज्यातल्या सहापैकी पाच महसुली जिल्ह्यांसह एकूण २४ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भारतीय जनता पार्टीने स्वत:कडे ठेवले असून, शिवसेनेला मुंबई शहरासह १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाबरोबर आता पालकमंत्रिपदांतही शिवसेनेला बरोबरीचा नव्हे, तर अर्धाच वाटा मिळाला.
उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या पदरी फक्त एकेक पालकमंत्रिपद आलेले आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे वर्चस्व असताना तेथील चार जिल्हे भाजपाने स्वत:कडे ठेवले आहेत. कोकणातील रायगड आणि पालघर हे दोन जिल्हे भाजपाने घेतले. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून ही व्यूहरचना भाजपाने आखली आहे. शिवाय पाच मंत्र्यांना दोन-दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
तुल्यबळ नेत्यांना त्यांचे स्वत:चे जिल्हे देऊ करण्यात आले आहेत. त्यात एकनाथ शिंदे (ठाणे), एकनाथ खडसे (जळगाव), गिरीश बापट (पुणे), रणजीत पाटील (अकोला), चंद्रपूर (सुधीर मुनगंटीवार), चंद्रकांत पाटील (कोल्हापूर) आणि पंकजा मुंडे (बीड) यांचा समावेश आहे.
सेनेचे कोकणातील लढवय्ये नेते रामदास कदम यांना औरंगाबादचे पालकमंत्रिपद दिले आहे. रायगड जिल्ह्यात भाजपाचा एकच आमदार असताना तेथे प्रकाश मेहतांना पालकमंत्रिपद दिले आहे. बीड आणि लातूरचे पालकमंत्रिपद पंकजा मुंडेंना दिले आहे. अमित देशमुख यांचे आणि मुंडे परिवाराचे सख्य सर्वश्रुत आहे.
११ आमदार देणाऱ्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांना देऊन हा जिल्हा नितीन गडकरींच्या वर्चस्वाखाली ठेवण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजीकचे म्हणून ओळखले जाणाऱ्या रणजीत पाटील यांना अकोला आणि वाशिमचे पालकमंत्रिपद दिले गेले आहे. प्रवीण पोटे यांना अमरावतीचे पालकमंत्रिपद देऊन गडकरी गटाचे आ. सुनील देशमुख यांची अडचण करण्याचा प्रयत्न झाला आहे. देशमुख-पोटे यांचे फारसे सख्य नाही. यवतमाळमध्ये सातपैकी पाच भाजपाचे आमदार असताना शिवसेनेचे संजय राठोड यांना पालकमंत्री करण्यात आले आहे. या पाचही आमदारांनी रणजीत पाटील यांची मागणी केली होती. तेथे शिवसेनेची सरशी झाली आहे. साताऱ्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे विजय शिवतारे यांना दिले गेले आहे. त्यांचे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील भांडण सर्वश्रूत आहे. तर नाशिकचे पालकमंत्रीपद जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना देऊ केले आहे. शिवाय महाजन यांच्याकडे महाकुंभ मेळाव्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. महाजन यांचे आणि एकनाथ खडसे यांचे संबंध फारसे मधूर नाहीत. त्या पार्श्वभूमीवर महाजनांवर टाकलेली मोठी जबाबदारी चर्चेचा विषय आहे
-------------
जिल्हा आणि पालकमंत्री असे
पुणे- गिरीश बापट, मुंबई उपनगर-विनोद तावडे, मुंबई शहर-सुभाष देसाई, पालघर-विष्णु सावरा, बीड आणि लातुर- पंकजा मुंडे, जळगाव व बुलढाणा- एकनाथ खडसे, अहमदनगर- राम शिंदे, सिंधुदुर्ग- दिपक केसरकर, रत्नागिरी- रविंद्र वायकर, धुळे - दादा भुसे, सातारा- विजय शिवतारे, यवतमाळ- संजय राठोड, सोलापुर- विजय देशमुख, अमरावती -प्रविण पोटे, परभणी व नांदेड- दिवाकर रावते, भंडारा, उस्मानाबाद- दिपक सावंत, नागपुर- चंद्रकात बावनकुळे, वर्धा, चंद्रपुर- सुधीर मुनगंटीवार, वाशिम, अकोला- रणजीत पाटील, हिंगोली - दिलीप कांबळे, जालना - बबनराव लोणीकर, औरंगाबाद -रामदास कदम, गडचिरोली -राजे अंम्ब्रीशराव आत्राम, गोंदिया -राजकुमार बडोले, ठाणे - एकनाथ शिंदे, नाशिक व नंदूरबार - गिरीष महाजन, सांगली व कोल्हापूर - चंद्रकांत पाटील, रायगड - प्रकाश मेहता

Web Title: The Guardian Minister of five revenue districts, BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.