स्टार्टअप प्रदर्शन, करिअर कौन्सिलिंगसह औरंगाबादमध्ये महारोजगार मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 06:49 IST2022-09-14T06:49:15+5:302022-09-14T06:49:58+5:30
औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) या मेळाव्याचे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्टार्टअप प्रदर्शन, करिअर कौन्सिलिंगसह औरंगाबादमध्ये महारोजगार मेळावा
मुंबई - मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे पंतप्रधान उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे त्याचबरोबर नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शन, युवकांसाठी करिअर कौन्सिलिंग, स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्धतेबाबत माहिती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग, अप्रेंटीशीपच्या संधी यांविषयी माहिती, फोटो गॅलरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजक यांना या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आणण्यात येणार असून पात्र उमेदवारांना तिथेच नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात मराठवाड्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन देण्यासाठी महारोजगार मेळाव्यासह इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून प्रधानमंत्री यांनी स्किल इंडिया मोहिमेद्वारे देशातील प्रत्येक युवकाला कौशल्य प्रशिक्षण आणि त्याद्वारे रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्याचे सुनिश्चित केले आहे. महारोजगार मेळावा आणि त्याबरोबर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधून मराठवाड्यातील रोजगार उपलब्धतेच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिक्त जागांवर उमेदवारांची थेट भरती
औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) या मेळाव्याचे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनस्थळी विविध उद्योजक आपले स्टॉल मांडणार असून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त जागांवर उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. मेळावास्थळी विविध उद्योग असोसिएशन यांचेही स्टॉल असणार आहेत. स्वयंरोजगाराबाबत इच्छुक उमेदवारांना माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी विविध महामंडळे, बँका, खाजगी संस्था तसेच स्वयंरोजगाराच्या योजना राबविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी या मेळावास्थळी उपलब्ध असणार आहेत. स्वयंरोजगारासाठी कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करून घ्यावे, याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात येईल.
स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मॅजिक इंडस्ट्रीज असोसिएशन हे इन्क्युबेटर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत विविध स्टार्टअप्सचे प्रदर्शन आणि सादरीकरण आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे स्टार्टअप्सना आपले इनोवेशन सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअप, युनिकॉर्न यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या नाविन्यताविषयक विविध संकल्पनांची माहिती देणारा स्टॉलही येथे असणार आहे. कौशल्य विकास विभागामार्फत युवकांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. फोटो गॅलरी आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून कौशल्य, उद्योजकता आणि महारोजगार मेळाव्याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. युवक- युवतींना कौशल्य विकास आणि रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या माध्यमातून व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.