मंगळागौरीच्या खेळांसाठी मोठी मागणी
By Admin | Updated: August 2, 2016 01:16 IST2016-08-02T01:16:44+5:302016-08-02T01:16:44+5:30
श्रावण महिना आला, की होणारा ऊनपावसाचा खेळ... सणासुदीने सजलेले दिवस... आणि आधुनिक पद्धतीने या सणांचा आनंद लुटणाऱ्या शहरातील महिला...

मंगळागौरीच्या खेळांसाठी मोठी मागणी
पुणे : श्रावण महिना आला, की होणारा ऊनपावसाचा खेळ... सणासुदीने सजलेले दिवस... आणि आधुनिक पद्धतीने या सणांचा आनंद लुटणाऱ्या शहरातील महिला... मंगळागौर हा श्रावणात साजरा केला जाणारा असाच एक सण.
पूर्वीच्या काळी माहेरी जाण्याचे आणि महिलांना एकत्रित येण्याचे साधन म्हणून साजरा केला जाणारा हा सण आता काळ बदलल्याने आधुनिक पद्धतीने साजरा केला जात आहे. इतकेच नाही तर खेळांमधून मनोरंजनाबरोबरच विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीही केली जात आहे.
पूर्वी नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या मैत्रिणी आणि बहिणी रात्रीचे जागरण करून मंगळागौरीचे खेळ खेळत असत. इतकेच नाही तर या महिला खेळांमध्ये अक्षरश: दंग होऊन जात.
मात्र, आता हे पारंपरिक खेळ खेळण्यासाठी महिलांच्या गटाला मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. मध्यमवयीन महिलांचे अनेक गट या खेळांच्या सरावामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.
(प्रतिनिधी)
>कोंबडा, गोफ खेळांमुळे सर्वांगाला व्यायामही
नोकरी आणि सणवार हे संभाळताना शहरातील मुलींची तारेवरची कसरत होते. घरातील जबाबदाऱ्या, नोकरीचा ताण हे सर्व सांभाळताना मुलींची ओढाताण होते. तसेच, आताच्या पिढीला हे सर्व पारंपरिक खेळ माहीत असतीलच, असे नाही. त्यामुळे खेळ तर खेळायचेत; मात्र त्याची फारशी माहिती नाही अशांकडून मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या गटांना मोठी मागणी असल्याचे दिसते. यात खेळल्या जाणाऱ्या फुगड्या, झिम्मा, पिंगा यांचे विविध प्रकार तसेच काचकिरडा, खुर्ची का मिर्ची, कोंबडा, गोफ यासारख्या खेळांमुळे सर्वांगाला व्यायामही होतो.
याबाबत महालक्ष्मी ग्रुपच्या अध्यक्षा अपर्णा बवरे म्हणाल्या, ‘‘आमचा १० जणींचा ग्रुप असून सगळ्या महिला ५० वर्षांहून अधिक वयाच्या आहेत. आम्हाला एका मंगळवारी तीन ते पाच ठिकाणांहून खेळण्यासाठी बोलावण्यात येते. यातील अनेक पारंपरिक खेळ सध्या माहीत नसल्याने तसेच आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने ही बोलावणी येतात. एका दिवशी जास्त ठिकाणी जायचे असल्याने आम्ही गाडी करून सर्व ठिकाणी जातो.’’ तर, पुढील पिढ्यांपर्यंत हे खेळ पोहोचविण्यास या माध्यमातून मदत होत असल्याचे मंगल ग्रुपच्या सुनीता जोशी यांनी सांगितले. हौैस म्हणून आम्ही हे खेळ खेळण्यास सुरुवात केली होती; मात्र आम्हाला अनेकांकडून खेळासाठी विचारणा करण्यात आली आणि आता तर ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही त्या म्हणाल्या. हे खेळ खेळत मंगळागौरीची रात्र जागविण्याची पद्धत आहे. मात्र, सध्या शहरातील महिलांच्या सोयीनुसार रात्रीचे खेळ कधी सकाळी, तर कधी दुपारी खेळले जातात. त्यामुळे आधुनिकतेची कास धरून रूढी-परंपरा जपण्यासाठी महिलांच्या ग्रुपला मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी बोलावण्याची अनोखी पद्धत सध्या शहरांमध्ये चांगलीच रूढ होत असल्याचे चित्र आहे.