अनुदानासाठी ‘अन्नत्याग’
By Admin | Updated: August 5, 2016 05:25 IST2016-08-05T05:25:17+5:302016-08-05T05:25:17+5:30
विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळावे, म्हणून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांच्या कृती समितीने गुरुवारी आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले.

अनुदानासाठी ‘अन्नत्याग’
मुंबई : राज्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळावे, म्हणून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांच्या कृती समितीने गुरुवारी आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले. वरिष्ठ कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील ‘कायम’ हा शब्द वगळून १०० टक्के अनुदान देण्याची कृती समितीची मागणी आहे.
राज्यातील सर्व सहसंचालक, कार्यालयांसमोर अनुदानाच्या मागणीसाठी समितीने ११ जुलै रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारविरोधात अन्नत्याग आंदोलन करावे लागले, अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक धोटे यांनी दिली. ते म्हणाले की, कृती समितीने वारंवार सरकारला निवेदन दिले आहे.
सरकार समितीच्या मागण्यांची दखल घेत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. याशिवाय शासन निर्देशानुसार विद्यापीठाने श्रेणी देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशी घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महाविद्यालयांतील सोयी-सुविधा तपासण्यासाठी सरकारने नेमलेल्या समित्यांचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यापीठामार्फत आकारण्यात येणाऱ्या शुल्काची प्रतिपूर्ती सरकारने करावी, विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा वेळेवर करावा, विकास अनुदान देण्याची व्यवस्था अंमलात आणावी, अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती समितीने शासनाला साकडे घातले आहे. (प्रतिनिधी)