आजोबांची जमीन ३६ वर्षांनी वारसाहक्काने नातवंडांना!

By Admin | Updated: April 23, 2017 01:30 IST2017-04-23T01:30:25+5:302017-04-23T01:30:25+5:30

दगडाबाई उर्फ दगडाबाई शेखलाल पिंजारी हिचा जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पाच हेक्टर शेतजमिनीवरील वारसाहक्काने मालकी अखेर तिच्या मृत्यूनंतर

Grandfather's land inherited 36 years of legacy! | आजोबांची जमीन ३६ वर्षांनी वारसाहक्काने नातवंडांना!

आजोबांची जमीन ३६ वर्षांनी वारसाहक्काने नातवंडांना!

मुंबई : दगडाबाई उर्फ दगडाबाई शेखलाल पिंजारी हिचा जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पाच हेक्टर शेतजमिनीवरील वारसाहक्काने मालकी अखेर तिच्या मृत्यूनंतर अंतिमत: सिद्ध झाली असून, तिच्या वारसांना या जमिनीचा ताबा आणि मालकी मिळणार आहे.
चोपड्या तालुक्याच्या वर्डी गावातील गट क्र. ५०५ (जुना सर्व्हे क्र. ७१)मधील पाच हेक्टर २८ आर शेतजमिनीवर अब्बास उर्फ गुलाब रुस्तम वंजारी याने केलेला प्रतिदावा सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने अमान्य केल्याने दगडाबाईला मरणोत्तर न्याय मिळाला. ही शेतजमीन रुस्तम नाथू पिंजारी या मुस्लीम व्यक्तीच्या मालकीची होती. सन १९८०च्या सुमारास मृत्युपत्र न करता रुस्तम पिंजारी यांचे निधन झाले. शेखलाल पिंजारी यांच्याशी विवाह झालेली दगडाबाई ही त्यांची एकमेव मुलगी व वारस. वारसाहक्काने वडिलांची शेतजमीन तिला मिळायला हवी होती, परंतु रुस्तम यांचे आपण दत्तकपुत्र आहोत, असे सांगत अब्बास उर्फ गुलाब पिंजारी याने प्रतिदावा केला आणि या जमिनीच्या मालकीचा व ताब्याचा वाद सुरू झाला.
दगडाबाईने या जमिनीवर वारसाहक्काने आपली मालकी सिद्ध करण्यासाठी व ताबा मिळण्यासाठी १९८१ मध्ये चोपडा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्या न्यायालयाने आॅगस्ट १९९८३मध्ये दगडाबाईच्या बाजूने निकाल दिला व अब्बासचा जमिनीवर कोणताही हक्क नाही, असे जाहीर केले. याविरुद्ध अब्बासने केलेले फर्स्ट अपील अंमळनेरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनीही सप्टेंबर १९९० मध्ये फेटाळले. याविरुद्ध अब्बासने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केलेले सेकंड अपील १७ वर्षे प्रलंबित राहिले. एप्रिल २००७ मध्ये न्या. व्ही. आर. किंगावकर यांनी अब्बासचे अपील मंजूर करून खालच्या दोन्ही न्यायालयांनी दगडाबाईच्या बाजूने दिलेले निकाल रद्द केले. हा निकाल लागेपर्यंत दगडाबाईचे निधन झाल्याने तिच्या वारसांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. त्या न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून खालच्या दोन्ही न्यायालयांचे निकाल कायम केले. त्यामुळे रुस्तम यांच्या निधनानंतर जी जमीन वारसाहक्काने दगडाबाई या त्यांच्या एकुलत्या एक मुलीस मिळायची होती, ती तिच्याही निधनानंतर तिच्या मुलांना म्हणजे रुस्तमच्या नातवंडांना मिळाली.
ही जमीन १२ वर्षांहून अधिक काळ आपल्या कब्जेवहिवाटीत असल्याने ‘अ‍ॅडव्हर्स पझेशन’ने ती आपल्या मालकीची झाली आहे, असा अब्बासचा दावा होता, परंतु तो अमान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जमिनीवरील आपली कब्जेवहिवाट व ताबा अब्बास पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाही. शिवाय ‘अ‍ॅडव्हर्स पझेशन’चा दावा करणाऱ्याने जमिनीवरील मूळ मालकाची मालकी मान्य करणे आवश्यक असते, कारण तोच त्याच्या दाव्याचा मूळ आधार असतो, परंतु प्रस्तुत प्रकरणात अब्बासने दगडाबाईची मालकी नाकारली आहे.
या सुनावणीत दगडाबाईच्या वारसांतर्फे अ‍ॅड. अंशुमन अनिमेश यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)

मुस्लिमांमध्ये दत्तक कसे?
मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात मूल दत्तक घेण्याची कुठेही तरतूद नाही. त्यामुळे अब्बासने जमिनीवर हक्क सांगताना आपण रुस्तम यांचा दत्तकपुत्र आहोत, हा केलेला दावाच निराधार आणि पोकळ होता. खालच्या दोन्ही न्यायालयांनी अब्बासचा दावा नाकारताना हाही मुद्दा विचारात घेतला होता. मात्र उच्च न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करून अब्बासच्या बाजूने निकाल दिला होता.

Web Title: Grandfather's land inherited 36 years of legacy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.