कॉर्पोरेट्सच्या साथीने होणार ग्राम - सामाजिक परिवर्तन! रामनाथ सुब्रमण्यम यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 05:41 AM2018-04-18T05:41:01+5:302018-04-18T05:41:01+5:30

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचा चेहरामोहरा पालटावा, तेथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सामाजिक समस्यांचाही निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाने आॅगस्ट २०१६मध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाला सुरुवात केली.

 Gram-social change will happen with corporates! Ramnath Subramanyam Information | कॉर्पोरेट्सच्या साथीने होणार ग्राम - सामाजिक परिवर्तन! रामनाथ सुब्रमण्यम यांची माहिती

कॉर्पोरेट्सच्या साथीने होणार ग्राम - सामाजिक परिवर्तन! रामनाथ सुब्रमण्यम यांची माहिती

Next

मुंबई: महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचा चेहरामोहरा पालटावा, तेथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सामाजिक समस्यांचाही निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाने आॅगस्ट २०१६मध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाला सुरुवात केली. या अभियानात अनेक बड्या उद्योग समूहांनी सहभाग नोंदविला असून हिंदुस्थान युनिलिव्हरनेही (एचयुएल) त्यात आघाडी घेतली आहे. अभियानासाठी एचयुएलने तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्य शासनाच्या या अभियानात तब्बल १७ प्रमुख उद्योगांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यापैकी टाटा समूह कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधीबाबत काम करीत आहे. तसेच ओला या अ‍ॅपआधिरत टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीशी यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार, ही कंपनी गावातील सुशिक्षित बेरोजगारांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणार असून इच्छुकांना त्यांचा कंपनीत वाहन चालक म्हणून नोकरीही मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचेही सुब्रमण्यम यांनी सांगितले.
गावागावांमधील विविध समस्या जाणून घेण्यासाठी, तसेच शासनाच्या योजना संभाव्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानाअंतर्गत २४० कंत्राटी ग्राम परिवर्तक सुमारे ६०० गावांमध्ये नेमण्यात आले आहेत.
हे परिवर्तक गावातच राहून, तसेच घरोघरी
फिरून, स्थानिकांशी संवाद साधून गावातील समस्या आणि गरजा जाणून घेतात. त्यानंतर या समस्या सोडविण्यासाठीचा कृती आराखडा तयार करून तो संबंधित जिल्हाधिकाºयाला सादर करतात.
या आराखड्याच्या आधारे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे प्रशासनाला सोपे होते. शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास, जलयुक्त शिवार आदी योजना राबविल्या जातात, मात्र त्याचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. आता अभियानाअंतर्गत करण्यात येत असलेल्या विशेष प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल सहा हजार नवीन घरांचे बांधकाम सुरू झाले आहे,
अशीही माहिती सुब्रमण्यम यांनी दिली.
या अभियानात सहभागी असलेले विविध उद्योग समूह त्यांच्या धोरणानुसार, ग्रामविकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यापैकी एचयुएलच्यावतीने ‘वॉश’ नावाचा स्वच्छता आणि आरोग्यसंबंधीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअंतर्गत एचयुएलने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘स्वच्छ आदत’ हा विशेष अभ्यासक्रम तयार केला असून तो संबंधित गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकविण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात पुस्तिकाही छापण्यात आल्या असून त्या गावात, शाळांत वितरित करण्यात येत आहेत. तोंड-हात धुण्याचे महत्त्व, पाणंदमुक्ती, शौचालयाची स्वच्छता, सांडपाण्याची आणि कचºयाची योग्य विल्हेवाट आदी गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून एचयुएल ग्राम परिवर्तनात वाटा उचलत आहे.

- वेळोवेळी हात न धुतल्याने किंवा साबणाचा वापर न केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढून आरोग्यासाठी किती मोठा धोका उद्भवतो, याबाबतची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. तसेच याबाबत त्यांच्यात किती जागरूकता निर्माण झाली, हे जाणून घेण्यासाठी विविध प्रश्न संचांद्वारे त्यांची नियमित चाचणी घेण्यात येते. चुकीच्या सवयी जाऊन आरोग्य आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना लागाव्यात. तसेच त्यांच्या माध्यमातून या गोष्टी त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि पर्यायाने समाजापर्यंत पोहोचाव्यात, हा या अभ्यासक्रमामागील मूळ उद्देश आहे.

Web Title:  Gram-social change will happen with corporates! Ramnath Subramanyam Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.