दुधातील भेसळ रोखण्यासाठी यंत्रणा ॲक्शन मोडवर: मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:13 IST2025-02-14T09:13:10+5:302025-02-14T09:13:28+5:30
कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठवण्यात आल्याचंही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी यंत्रणा ॲक्शन मोडवर: मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी
Maharashtra Government: अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ०६ हजार ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ हजार ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुंबईत मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दूध वाहनांच्या तपासणीत मुलुंड चेक नाका (पूर्व), हायवे, आनंदनगर येथे १३ वाहने एक लाख ४१ हजार ६० किंमतीचा २ हजार ८३३ लिटर दुधाचा साठा, मानखुर्द (वाशी) चेक नाका येथे ४१ वाहने ३१ हजार २०० किंमतीचा ९८ हजार २१५ लिटर दुधाचा साठा, दहिसर चेक नाका येथे १९ वाहने ५३ लाख ८६ हजार ३८० किंमतीचा ८ हजार ९७७ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे २५ वाहने ४० लाख ४८ हजार १९२ किंमतीचा ७३ हजार ३७२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यांचा समावेश होता.
दरम्यान, मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठवण्यात आल्याचंही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.