दूध दरावरून सरकारची कोंडी
By Admin | Updated: April 1, 2015 02:16 IST2015-04-01T02:16:07+5:302015-04-01T02:16:07+5:30
दुधाचे कोसळलेले दर आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी प्रश्नांचा भडिमार करीत आज सरकारची

दूध दरावरून सरकारची कोंडी
मुंबई : दुधाचे कोसळलेले दर आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी प्रश्नांचा भडिमार
करीत आज सरकारची चांगलीच कोंडी केली. वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या आधारे बनविण्यात आलेले छापील उत्तर आणि राज्यमंत्र्यांनी दिलेली
अपुरी माहितीे यामुळे विषय राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुधाच्या खरेदी दरातील घसरणीबाबत प्रश्न विचारला. दूध दर कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शिवाय दूध दराबाबत मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींची एक बैठक झाली. या बैठकीतील निर्णयाची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात दोन महिने सहीअभावी पडून होती, असा आरोप मुंडे यांनी केला.
यावर राज्यमंत्री विजय देशमुख म्हणाले की, दुधाचे उत्पादन वाढले त्याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दर घटले. परिणामी देशांतर्गत दूध भुकटीच्या निर्यातीवर परिणाम झाला. मात्र कोसळलेल्या दरांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना राज्यमंत्री देशमुख समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यातच छापील उत्तरात वृत्तपत्रांतील माहितीचा आधार घेतल्याने विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.
दूध उत्पादकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार गंभीर
नाही, अशी टीका विरोधी सदस्यांनी केली. यानंतर अखेर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रश्न
राखून ठेवत असल्याचे जाहीर
केले. (प्रतिनिधी)