सरकारला कामगारांचा हिसका दाखवावा लागेल
By Admin | Updated: April 29, 2017 02:46 IST2017-04-29T02:46:32+5:302017-04-29T02:46:32+5:30
निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देते. मात्र, भाजपाक डून आश्वासनांची पूर्तता होत नाही.

सरकारला कामगारांचा हिसका दाखवावा लागेल
पिंपरी-चिंचवड : निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देते. मात्र, भाजपाक डून आश्वासनांची पूर्तता होत नाही. यासाठी सर्वपक्षीयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. कामगारांचा हिसका जोपर्यंत या सरकारला दाखवला जात नाही, तोपर्यंत या कामगार नगरीतील समस्या सुटणार नाहीत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.
पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. शहरातील सर्व पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपाला आठवण करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीयांनी बुधवारी चिंचवड येथील महावीर चौैकात ‘आश्वासनांची आठवण’ आंदोलन करून लाक्षणिक उपोषणही केले होते. या आंदोलकांना धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मार्गदर्शन केले.
मुंडे म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या प्रचारावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे तसेच शास्तीकर माफीचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा झाली. भाजपा सरकारला जरी आश्वासनांचा विसर पडला असला तरी येत्या पावसाळी अधिवेशनात त्यासाठी संघर्ष करणार आहे.’’ (प्रतिनिधी)
सरकार केवळ संघधार्जिणे
या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे म्हणाले की, भाजपा सरकार गरिबांचे नसून त्यांना सामान्यांच्या समस्यांबाबत देणेघेणे नाही. शेतकरी आत्महत्या झाल्या किंवा महागाईने सामान्य जनता होरपळली तरी या सरकारला सोयरसुतक नाही. भाजपाच्या नेत्यांना केवळ सत्ता आणि सत्ताच हवी आहे. संघधार्जिण्या सरकारला धडा शिकवावाच लागेल.
मुंडे यांच्या भेटीनंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्त्यांचा मोर्चा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाकडे निघाला. त्या वेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत तूर रस्त्यावर टाकण्यात आली.