सीबीआयला मदत करणे शासनाने जाणीवपूर्वक टाळले

By Admin | Updated: August 21, 2015 00:54 IST2015-08-21T00:54:15+5:302015-08-21T00:54:15+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे

Government has consciously avoided the CBI's help | सीबीआयला मदत करणे शासनाने जाणीवपूर्वक टाळले

सीबीआयला मदत करणे शासनाने जाणीवपूर्वक टाळले

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे सोपविण्यात आल्यानंतर वारंवार मागणी करूनही तपासासाठी लागणारे अधिकारी व कर्मचारी राज्य शासनाने दिले नाहीत. तपासाच्या नावाखाली राज्यशासन ढोंगबाजी करत असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंनिसचे अध्यक्ष एन. डी. पाटील यांनी गुरूवारी केला.
दाभोलकर यांच्या खूनाला २ वर्षे पूर्ण होऊन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात शासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ महर्षी शिंदे पूल ते मनोहर मंगल कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. यावेळी खासदार हुसेन दलवाई, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अंनिसचे पदाधिकारी मिलिंद देशमुख, हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, कामगार नेत्या मुक्ता मनोहर व अन्य मान्यवर उपस्थित होते. सीबीआयच्या ज्या अधिकाऱ्याकडे तपास दिला त्याला अंनिस ही संघटना नेमकी काय आहे याचीच माहिती नाही, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

सोलापुरात धरणे
सोलापूर : डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात मारेकरी सापडत नसल्याचा निषेध नोंदवत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले़
‘फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर,’ डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, या घोषणांनी गुरुवारी सातारा शहर दणाणले. नगरमध्ये अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़

Web Title: Government has consciously avoided the CBI's help