गोसेखुर्दचा निधी संपला
By Admin | Updated: July 27, 2014 01:29 IST2014-07-27T01:29:27+5:302014-07-27T01:29:27+5:30
गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी जाहीर केलेल्या ११९९ कोटींच्या विशेष पॅकेजपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला ६०० कोटींचा निधी खर्च झाला असून, विभागीय आयुक्तांनी नव्याने ३०० कोटींची

गोसेखुर्दचा निधी संपला
विशेष पॅकेज : ३०० कोटींची मागणी
चंद्रशेखर बोबडे - नागपूर
गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी जाहीर केलेल्या ११९९ कोटींच्या विशेष पॅकेजपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला ६०० कोटींचा निधी खर्च झाला असून, विभागीय आयुक्तांनी नव्याने ३०० कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. निधी संपल्याने काही महिन्यांपासून कामे ठप्प झाली आहेत.
अडीच दशकाहून अधिक काळ रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जून २०१३ मध्ये ११९९.६० कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले होते.
या पॅकेजची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सोपविण्यात आली होती.
पॅकेजमधून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून ६८४ कोटींचा पहिला हप्ता आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला होता.
प्रकल्पग्रस्तांचे मोबदला वाटप, नोकरीऐवजी रोख रक्कम, घरबांधणी, गोठेबांधणीसाठी अनुदान आणि इतरही बाबींवर हा निधी खर्च झाला असून, नव्याने ३०० कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त झाल्यावरच पुढच्या कामांना गती येण्याची शक्यता आहे.
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण ८५ गावे बाधित होणार आहेत. आतापर्यंत १९,०२१ प्रकल्पग्रस्तांची ६१७.६७ कोटींची देयके निकाली काढण्यात आली असून, त्यांना ५१६ कोटींचे वाटप करण्यात आले आहे.