गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन

By Admin | Updated: June 4, 2014 14:06 IST2014-06-04T14:03:04+5:302014-06-04T14:06:27+5:30

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी परळीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला.

Gopinath Munde merges with infinity | गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन

गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन

 ऑनलाइन टीम

परळी(बीड), दि. ४ - भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी परळीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. मुंडे साहेब अमर रहे, परत या परत या मुंडे साहेब परत या अशा घोषणा देत पाणावलेल्या डोळ्यांनी लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला. 

मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेचे दिल्लीत अपघाती निधन झाले होते. बुधवारी सकाळी विशेष विमानाने मुंडेचे पार्थिव परळीत आणण्यात आले. वैद्यनाथ साखर कारखानाच्या प्रांगणात  मुंडेचे पार्थिव दाखल होताच मैदानात उपस्थित असलेल्या लाखो कार्यकर्त्यांचा शोक अनावर झाला. आपल्या लाडक्या नेत्याचे  अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंडेच्या पार्थिवाजवळ एकच गर्दी केली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांना जुमानले नाही. अखेरीस पंकजा मुंडे - पालवे यांनी मंचावरुन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मुंडेसाहेबांचा अपमान होईल असे वर्तन करु नका असे आवाहन त्या वारंवार करत होत्या.

दुपारी दीडच्या सुमारास मुंडेच्या पार्थिवावर अंत्यविधीला सुरुवात झाली. दोनच्या सुमारास पंकजा मुंडेंनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. 'मुंडे साहेब अमर रहे, मुंडे साहेब परत या, जब तक सूरज चांद रहेगा, मुंडेसाहेब का नाम रहेगा' अशा घोषणांनी प्रांगणाचा परिसर दणाणून गेला होता. मैदानात उपस्थित असलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी दोन्ही हात वर करुन पाणावलेल्या डोळ्यांनी या लोकनेत्याला आदरांजली वाहिली. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, काँग्रेस - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अंत्यसंस्कारासाठी मैदानात उपस्थित होते.

Web Title: Gopinath Munde merges with infinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.