गुड न्यूज: आगामी ४८ तासांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 06:21 PM2023-06-10T18:21:27+5:302023-06-10T18:24:56+5:30
पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे.
केरळात दाखल झालेला मान्सून राज्यात येण्यास अवधी असला तरी हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्रात आगामी ४८ तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकलेय. पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सून आज 10 जून रोजी पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील #कारवारपर्यंत पुढे सरकला आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2023
पुढील ४८ तासांत #गोवा आणि #महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे.
IMD pic.twitter.com/T5YFowAaDr
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या तीव्रतेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग आणि दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, मन्नारची खाडी, नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकला आहे.
अरबी समुद्रात २०२३ या वर्षातील पहिलेच मान्सूनपूर्व वादळ दिवसेंदिवस जोर धरत आहे. समुद्रात निर्माण झालेल्या खोल दबावाचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते वेगाने पुढे जात आहे. येत्या तीन दिवसांत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. १२ जूनपर्यंत ही प्रणाली अत्यंत तीव्र चक्रीवादळाची ताकद कायम ठेवण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम गुजरातच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये दिसून येईल.