महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 20:07 IST2024-10-11T20:04:31+5:302024-10-11T20:07:14+5:30
ज्या महिलांनी अद्याप सदर योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.

महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
Mukhyamantri Ladki Bahin Yojana ( Marathi News ) : सरकारने राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप सदर योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज न करू शकलेल्या महिलांसाठी सरकारने आणखी चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. १५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. मात्र हे अर्ज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच दाखल करावेत, अशी अट सरकारने ठेवली आहे.
दरम्यान, सरकारने राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू केल्यापासून अनेकदा अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची १५ ऑक्टोबर ही शेवटची संधी ठरण्याची शक्यता आहे.
योजना कधीपर्यंत सुरू राहणार?
विरोधी पक्षांकडून लाडकी बहीण योजनेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. "लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड येथील वचनपूर्ती मेळाव्यात दिली होती. तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम ३ हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.