गोल्ड स्मगलिंगचा सेंट्रल हब !
By Admin | Updated: January 18, 2015 00:53 IST2015-01-18T00:53:55+5:302015-01-18T00:53:55+5:30
देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरमध्ये आता सोनेतस्करांनी आपले प्रशस्त नेटवर्क तयार केले आहे. कधी विमानातून तर कधी रेल्वेने, ठिकठिकाणांहून येथे सोने आणले जाते. येथून ते देशभरात

गोल्ड स्मगलिंगचा सेंट्रल हब !
बिस्कीट, कॅटबरी : नागपूर टू आॅल इंडिया
नरेश डोंगरे - नागपूर
देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरमध्ये आता सोनेतस्करांनी आपले प्रशस्त नेटवर्क तयार केले आहे. कधी विमानातून तर कधी रेल्वेने, ठिकठिकाणांहून येथे सोने आणले जाते. येथून ते देशभरात ठिकठिकाणी पाठविले जाते. गेल्या दोन तीन वर्षातील नागपुरातील सोनेतस्करीच्या घटनांवर लक्ष टाकले तर नागपूरला गोल्ड स्मगलर्स्नी सेंट्रल हब बनविले की काय, अशी शंका यावी.
प्रारंभी खाडी देशातून विमानाने नागपुरात सोन्याची खेप आणली जायची. येथून त्याची ठिकठिकाणी तस्करी केली जायची. मात्र, विमानतळावर तस्करीचे सोने पकडले जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे अलिकडे सोन्याच्या तस्करीसाठी रेल्वेचा वापर केला जातो. १० ग्रामची नाणी, १०० ग्रामची बिस्किटे आणि १ किलोची कॅडबरी बनवून तस्कर त्याची बिनबोभाट तस्करी करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशातून घुसखोरांमार्फत सोने भारतात आणण्याच्या घटना अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशाचे मध्यवर्ती स्थळ असल्यामुळे नागपुरात सोने आणून येथून त्याची वेगवेगळ्या प्रांतात तस्करी केली जाते.
तस्करांची साखळी
भारत-बांगला देशाच्या सीमेवर असलेल्या कोलकाता नजीकच्या मालदा (प. बंगाल) मधील तरुणांचा (घुसखोरांचा) सोनेतस्करीसाठी वापर केला जातो. अशीच तस्करी करताना पकडल्या गेलेल्या आरोपींनी काही दिवसांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारी माहिती दिली. त्यानुसार, बांगला देशात तोळ्यामागे सोने तीन ते चार हजार रुपये स्वस्त आहे. अर्थात् भारतात सोने ३० लाख रुपये किलो दराने विकत मिळत असेल तर बांगला देशात ते २६ लाख ते २७ लाख रुपये प्रतिकिलो दराने मिळते. एक घुसखोर दोन ते पाच किलो सोने सहजपणे एकावेळी बांगला देशातून मालदा-कोलकातात (भारतात) आणतो. तेथे त्या सोन्याला १०० ग्रामचे बिस्कीट, १ किलोची कॅडबरी अशा सुबक स्वरुपात रूपांतरित केले जाते. सोने तस्करीत गुंतलेले ‘बडे व्यावसायिक’ ते आपल्या हस्तकांमार्फत पाहिजे त्या ठिकाणी बोलवून घेतात. यासाठी तस्करांची एक साखळीच काम करते. एका देशातून दुसऱ्या देशात (घुसखोरी करून) सोेने पोहचविणारे वेगळे असतात. कारागिरांकडून त्या सोन्याला वजन आणि आकार देणारे दुसरे आणि तेथून ठिकठिकाणी ते पोहचविणारे तिसरेच कुणी असतात. अनेकदा सोन्याच्या तस्करीत कुरियरच्या आडून हवाला करणारेही महत्त्वाची भूमिका वठवितात, असेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.
रिस्क फॅक्टर अन्...
सोने तस्करीत रिस्क फॅक्टर आहेच. मात्र, कमाईसुद्धा घसघशीत आहे. बांगला देशातून भारतात आलेले सोने खर्च वजा जाता किलोमागे चक्क तीन ते साडेतीन लाख रुपये नफा मिळवून देते. एक व्यक्ती एका वेळी किमान ५ ते १० किलो सोन्याची तस्करी सहजपणे करू शकतो. पँट, शर्ट, जॅकेट, कोटमधून कॅडबरी आणि बिस्किटाच्या स्वरुपातील सोन्याची तस्करी बिनबोभाट केली जाते. त्यामुळे या तस्करीत गुंतलेली मंडळी एका खेपेला चक्क अडीच ते पाच कोटींची उलाढाल करतानाच १५ ते ३० लाखांचा घसघशीत नफा पदरात पाडून घेतात. कधी कधी तस्करांचा गेम फसतो. हस्तक (तस्कर) पकडले जातात. मात्र, तस्करीत गुंतलेले त्यातून बाहेर पडण्यासाठी आधीच तजविज करून ठेवतात. सोन्याची बिलं सादर केली जातात. ही तस्करी नव्हे तर व्यवहार असल्याचेही पटवून दिले जाते. ९ जानेवारीला ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये जीआरपीने भुसावळजवळ देवांग जयेंद्र शहा (वय ३२, नालासोपारा, जि. ठाणे) याला आठ (किलो) कॅडबरीजसह पकडले. त्याची चौकशी करण्याची संधीच पोलिसांना मिळाली नाही. त्याची दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्तता झाली.