गोव्याचे पर्यटन मंत्री 52 तास कोणत्याही सुरक्षेविना, पोलिस खात्यावर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 14:59 IST2016-07-30T13:44:15+5:302016-07-30T14:59:19+5:30
गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांच्यावरच कोणत्याही सुरक्षेवीना फिरण्याची वेळ आली

गोव्याचे पर्यटन मंत्री 52 तास कोणत्याही सुरक्षेविना, पोलिस खात्यावर ठपका
>सद्गुरू पाटील
पणजी : गोव्यात येणा-या देश- विदेशातील पर्यटकांची सुरक्षा, गोव्याच्या एकूणच किनारपट्टीची व पर्यटन व्यवसायाची सुरक्षा याबाबत विधानसभेत व विधानसभेबाहेर सातत्याने चर्चा घडत असतात पण आता प्रथमच चक्क गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांच्यावरच कोणत्याही सुरक्षेवीना फिरण्याची वेळ आली आहे. गेले 52 तास आपण सुरक्षेवीना असून पोलिस खात्याला त्याबाबत काहीच पडून गेलेले नाही, असे मंत्री परुळेकर यांनी शनिवारी लोकमतला सांगितले.
मंत्री परुळेकर हे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. ते विविध कारणांवरून अनेकदा चर्चेत असतात. त्यांना व्हाय दर्जाचे सुरक्षा कवच होते. म्हणजे त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एकूण आठ माणसे होती. त्यापैकी दोघे सुपरवायझर होते. पोलिस खात्यातील वरिष्ठांनी अचानक वायरलेस संदेशाद्वारे या दोघा सुपरवायझरांची रात्रीच्यावेळी बदली केली. मंत्री परुळेकर हे सध्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यांना याविषयी कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ते नाराज झाले.
मंत्री परुळेकर म्हणाले, की मला सुरक्षा शेवटी माझ्या विश्वासातील व्यक्तींकडून हवी आहे. उगाच कुणालाही जर माझ्या सुरक्षेसाठी पोलिस खात्याने पाठविले तर ते ठिक होत नाही. दोघे विश्वासातील सुपरवायझर पोलिस खात्याने बदलले. तत्पूर्वी माङयाशी साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे नाराज होऊन मी माझ्या सुरक्षेसाठी असलेल्या सगळ्य़ा ताफ्याला परत पाठविले. मी अशी कृती केल्यानंतर तरी पोलिस खात्यातील प्रमुख माझ्याशी चर्चा करतील व विश्वासू व्यक्ती माझ्या सुरक्षेसाठी पुरवतील अशी अपेक्षा होती पण गेले 52 तास पोलिस खात्याने दखलही घेतली नाही. सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असून मी गेले 52 तास अंगरक्षकावीना आहे. कोणत्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था माझ्यासोबत व माझ्या घरीही नाही. पोलिस खाते व एकूणच गृह खाते एका ज्येष्ठ मंत्र्याच्या सुरक्षेबाबत गंभीरच नाही का असा प्रश्न मला पडतो.
दरम्यान, मंत्री परुळेकर यांनी या स्थितीची कल्पना शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयास दिली आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे आज एका सोहळ्य़ानिमित्त गोव्यात येणार असून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहचण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.