गोवा महाराष्ट्रात विलीन न झाल्याने वाचलो : काँग्रेस
By Admin | Updated: August 17, 2016 13:30 IST2016-08-17T13:30:46+5:302016-08-17T13:30:46+5:30
गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर आमचे गोवा राज्य महाराष्ट्राचा एक छोटा जिल्हा बनून राहिले असते. आम्ही महाराष्ट्रात गेलो नाही, म्हणून वाचलो असे मत माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरोंनी व्यक्त केले.

गोवा महाराष्ट्रात विलीन न झाल्याने वाचलो : काँग्रेस
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १७ - गोवा मुक्तीनंतर काही लोकांनी व काही राजकीय पक्षांनी गोव्याला महाराष्ट्रात विलिन करण्याचा घाट घातला होता. गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर आमचे गोवा राज्य महाराष्ट्राचा एक छोटा जिल्हा बनून राहिले असते. आम्ही महाराष्ट्रात गेलो नाही, म्हणजेच विलिनीकरण झाले नाही म्हणून वाचलो, असे मत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे विद्यमान अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
गोवा विधानसभेत गेल्या आठवडय़ात मराठीलाही गोव्यात राजभाषेचे स्थान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव संमत झाला आहे. लोकांना विश्वासात घेऊन व लोकांशी चर्चा करून याविषयी निर्णय घ्यावा, अशी भाजप आमदाराने सूचविलेली दुरुस्ती या ठरावात समाविष्ट करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी येथे काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना फालेरो म्हणाले, की गोव्याने स्वतंत्र अस्तित्व राखले आहे. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले नाही, कारण कोंकणी हीच गोव्याची भाषा आहे. आम्ही मराठी ही गोव्याची भाषा असे म्हटले असते तर मुक्तीनंतर लगेच आम्ही महाराष्ट्राचा भाग बनलो असतो व छोटासा एक जिल्हा बनून राहिलो असतो.
फालेरो म्हणाले, की सरकारने किंवा अन्य कुणीच पुन्हा गोव्यात भाषावादाचे भूत आणू नये. भाषेच्या प्रश्नावर समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. मी गोवा विधानसभेत प्रथम प्रवेश केला होता तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार अधिकारावर होते व स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यावेळी आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षाने गोव्याला घटक राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी श्रीमती इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. त्यावेळी तुम्ही अगोदर तुमची भाषा कोणती ते ठरवा, मग आम्ही तुम्हाला घटक राज्य देतो, असे इंदिरा गांधी व नंतर स्व. राजीव गांधी यांनीही सांगितले होते. त्यानंतर आम्ही कोंकणी हीच गोव्याची एकमेव राजभाषा व कोंकणी हीच अस्मिता असल्याचे मान्य केले. गोवा राजभाषा कायद्यात कोंकणीला राजभाषेचे स्थान व मराठीला सहभाषेचे स्थान आहे. कोंकणीच्या आधारे आम्हाला घटक राज्य मिळाले. कोंकणीच्या आधारे आम्हाला सरकारी सेवेत गोमंतकीयांनाच नोक:या मिळवून देणो शक्य झाले.
फालेरो म्हणाले, की गोवा राजभाषा कायद्यात मराठीला अभिमानाची जागा मिळालेली आहे. कारण मराठीचे गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक साहित्यिक क्षेत्रत योगदान खूप मोठे आहे. कोंकणी प्रारंभीच्या काळात विकसित होऊ शकली नाही, त्यामागे ऐतिहासिक कारणो आहेत. गोवा पोतरुगीजांच्या राजवटीत राहिल्याने कोंकणीचा विकास झाला नव्हता. कोंकणी राजभाषा व्हावी म्हणून गोव्यात हिंसक आंदोलन झाले होते व काहीजणांना प्राणही द्यावा लागला होता. आता पुन्हा कुणीच भाषावाद उकरून काढू नये. कारण गोव्याला पुन्हा असे आंदोलन परवडणारे नाही. आम्ही मराठीच्या विरोधात नाही पण कोंकणी हीच एकमेव राजभाषा असावी ही आमची भूमिका आहे.