गडचिरोलीच्या जंगलातील वनौषधी होणार ग्लोबल
By Admin | Updated: September 9, 2014 04:59 IST2014-09-09T04:59:05+5:302014-09-09T04:59:05+5:30
७८ टक्के वन असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलातील दुर्लक्षित वनौषधी आता ग्लोबल होण्याच्या मार्गावर आहे.

गडचिरोलीच्या जंगलातील वनौषधी होणार ग्लोबल
गडचिरोली : ७८ टक्के वन असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलातील दुर्लक्षित वनौषधी आता ग्लोबल होण्याच्या मार्गावर आहे. येथील जंगलात आढळणार्या वनोपजापासून गडचिरोली वनविभागाने ३२ प्रकारची औषधी वनस्पती तयार केली असून यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्याबरोबरच औषधी वनस्पती व जंगलाचे संवर्धन देखील होणार आहे.
गडचिरोलीच्या घनदाट जंगलात औषधी गुण असलेल्या हजारो वनस्पती व झाडे आहेत. या झाडांचा उपयोग येथील वैदू औषधी म्हणून करतात. मात्र एखाद्या रोगावर नेमक्या कोणत्या झाडाचे औषध देतात याची माहिती ते इतरांना सांगत नसल्याने याबद्दलचे ज्ञान र्मयादित राहत होते. वनविभागाने जिल्ह्यातील सुमारे २८0 वैदूंची सभा घेऊन कोणत्या रोगावर कोणत्या झाडाचा औषधी उपयोग केल्या जातो ही माहिती जाणून घेतली.
त्यानंतर औषधी गुण असलेल्या बेहडा, पळसफूल, शरफुंखा, लाजाळू, ब्राrी, गुडवेल, सहचर, बीजा, बाहवा, खैरसाल, रक्तरोहणी, भुईनिंब आदी सुमारे १00 प्रकारच्या झाडांची आवश्यकतेनुसार पाने, साल, फुले, फळे, मुळे गोळा केली. यापासून चूर्ण तयार करून ते चूर्ण जिल्ह्यातील नोंदणीकृत वैदूंकडे उपलब्ध केले जाणार आहे.
ही वनौषधी देशभरात पोहोचविण्याचा मानस गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी अण्णा बत्तुला यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे, वनोपज नागरिकांकडून एका विशिष्ट दराने खरेदी केले जाणार असल्याने यातून स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त होणार आहे.
सद्यस्थितीत गडचिरोली येथेच वनौषधी तयार करण्याचा प्रकल्प स्थापन करण्यात आला असला तरी भविष्यात पाचही वनविभागात अशा प्रकारचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात टॅबलेट व सिरपही तयार करण्यात येणार आहे. वनौषधींची विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)