“प्लाझ्मा केंद्रातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या!” आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:40 IST2025-10-31T18:39:22+5:302025-10-31T18:40:22+5:30
Sunil Prabhu: उद्धव सेनेचे नेते आणि आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटरमधील कर्मचाऱ्यांसदर्भात मागणी केली.

“प्लाझ्मा केंद्रातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या!” आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखालील परळ येथील केईएम रुग्णालयातील नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटर या संस्थेतील १८ कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायम करण्याची आणि ५ निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देय रक्कम तत्काळ देण्याची आग्रही मागणी उद्धव सेनेचे नेते आणि आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गेल्या ३६ वर्षांपासून या केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मानव रक्तापासून तयार होणाऱ्या आयव्हीआयजी आणि अल्ब्युमिन या महत्त्वाच्या औषधांच्या निर्मितीत आपले आयुष्य घालवले. या औषधांद्वारे पालिकेच्या रुग्णालयांना आणि सरकारी योजनांखालील रुग्णांना उपचार मिळतात. तरीदेखील, आज या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या उपजीविकेची लढाई करावी लागत आहे.
महापालिकेकडे सुमारे ६ कोटी २४ लाख रुपये थकीत असून, निधी उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन थांबविण्यात आल्याने त्यांच्यावर दिवाळीच्या तोंडावर आर्थिक संकट ओढवले आहे. २०२० साली विधानसभेत या संदर्भात तारांकित मी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
माजी अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी २०१९ साली विधी विभागाचा अभिप्राय घेत हा कर्मचारी वर्ग मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ७९ आणि ८०(२) अंतर्गत पालिका सेवेत घेता येऊ शकतो, असे स्पष्ट केले होते याकडे आमदार प्रभूंनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.