मुंबई : काही लोकांना जेलमध्ये टाकायचंय, त्यासाठी मला गृहमंत्रीपद हवंय, असे वादग्रस्त विधान करून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी खळबळ उडवून दिली.एका इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमात कदम बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळातसुद्धा मी गृहमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. कारण मंत्रालयात बसून भ्रष्टाचार केलेल्या लोकांना मला जेलमध्ये टाकायचे आहे. शिवसेनेने गृहमंत्रीपद मागितले होते पण दिले नाही. आम्हाला आजही गृहमंत्रीपद हवे आहे. खरंच सांगतोय, तशी बातमी करा. माझी हरकत नाही, असेही कदम यांनी पत्रकारांना सांगून टाकले.मंत्री कदम एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, पर्यावरण खात्यामार्फत सध्या मी सुरू केलेल्या कारवाईमुळे कधीकधी मुख्यमंत्री मला दमाने घ्या, असा सल्ला देतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुरस्कार मिळालेला एक कारखाना प्रत्यक्षात प्रदूषण करताना आढळला. आता त्याच कारखान्याला नोटीस द्यायला मी लावली आहे. अनेक कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या प्रदूषणाची तपासणी आपण स्वत: करणार आहोत. झाडे तोडण्याबाबतही तेच आहे. अनेक ठिकाणी सररास झाडे तोडण्याचे प्रकार घडतात. मंत्री व सचिवांनी केवळ मंत्रालयात बसून चालणार नाही, असे कदम म्हणाले. प्रदूषणामुळे समुद्रातील डॉल्फीनच्या झालेल्या मृत्यूची युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. त्यामुळे याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. समुद्रातील प्रदूषणाबाबत गंभीर विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
गृहखाते द्या, काहींना जेलमध्ये टाकायचंय
By admin | Updated: June 6, 2015 02:10 IST