पाच हजार द्या अन् डॉक्टर व्हा !

By Admin | Updated: July 22, 2015 00:54 IST2015-07-22T00:54:39+5:302015-07-22T00:54:39+5:30

कुठलेही पुस्तक न वाचता, परीक्षा न देता अवघ्या पाच हजारांत डॉक्टर करणाऱ्या रॅकेटचा ‘लोकमत’ने मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. ‘लोकमत’च्या जिल्हा प्रतिनिधीनेच

Give five thousand and be a doctor! | पाच हजार द्या अन् डॉक्टर व्हा !

पाच हजार द्या अन् डॉक्टर व्हा !

दत्ता थोरे, लातूर
कुठलेही पुस्तक न वाचता, परीक्षा न देता अवघ्या पाच हजारांत डॉक्टर करणाऱ्या रॅकेटचा ‘लोकमत’ने मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. ‘लोकमत’च्या जिल्हा प्रतिनिधीनेच ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स’ ही दोन वर्षांची पदविका मिळवत हा प्रकार उघडकीस आणला.
स्टिंगची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह बोगस डॉक्टरची पदवी देणाऱ्या रॅकेटच्या घर वजा कार्यालयावर रात्री धाड टाकली. त्यात त्यांना बेकायदेशीर औषध निर्मितीही होत असल्याची माहिती समोर आली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती. बोगस डॉक्टरांना बनावट पदव्या देणारी टोळी लातुरात कार्यरत असल्याची कुणकुण लागताच ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करण्याचे ठरविले. त्यानुसार ‘लोकमत’ जिल्हा प्रतिनिधीने ‘त्या’ घराचा माग काढला. पक्की माहिती मिळताच लातुरातील अवंतीनगरातील श्रीनिवास आयुर्वेद भवनात महाराष्ट्र आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष आर. बी. वाडकर यांचे ‘आयुर्वेद भवन’ निवासस्थान गाठले. मी बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टर म्हणून काम करीत असून मला पदवी हवी असल्याची विनंती प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याकडे केली. त्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे देण्याचेही मान्य केले. १५ हजारांच्या मागणीवरुन सौदा पाच हजारांवर आला आणि महिनाभरात जिल्हा प्रतिनिधीला डिप्लोमा इन ‘नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स’ पदवीची डिग्री मिळाली. सोबत दोन वर्षाच्या गुणपत्रिका आणि ज्या कथित महाविद्यालयात जिल्हा प्रतिनिधींचे शिक्षण झाले त्या महाविद्यालयाचे एक ओळखपत्रही दिले गेले.
बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना ‘लोकमत’ने या रॅकेटची माहिती दिली. हे स्टिंग प्रकाशित झाल्यानंतर पुरावे नष्ट होतील या शक्यतेने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. एच. दुधाळ यांचे पथक व पोलीस अधिकाऱ्यांसह मंगळवारी रात्रीच नऊ वाजता वाडकर यांच्या घरावर धाड टाकली.

Web Title: Give five thousand and be a doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.