तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:06 IST2025-08-05T18:05:11+5:302025-08-05T18:06:59+5:30
Uddhav Thackeray: येत्या ऑक्टोबरच्या अखेरीस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
येत्या ऑक्टोबरच्या अखेरीस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि वसई-विरार या महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात जिल्हाप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. "महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी जोरात सुरू करा. गटप्रमुखांची नेमणूक पूर्ण करा. कोर्टाच्या निर्णयानुसार आणि नव्या प्रभाग रचनेनुसार ज्या महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्याकडे विशेष लक्ष द्या. सध्या जे काही घडत आहे, त्याचा बारकाईने आढावा घ्या," असे स्पष्ट निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरूवात झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकीय चित्रात मोठा बदल घडू शकतो,” असं मत अनेक राजकीय नेत्यांनी मांडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत वेळोवेळी सकारात्मक संकेत दिले असले, तरी राज ठाकरे मात्र अजूनही स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळत आहेत.
दरम्यान, अलीकडेच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख करत म्हटलं, “२० वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र व्यासपीठावर येऊ शकतो, मग तुम्ही एकमेकांशी का भांडता?” मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार आहे, असा आत्मविश्वास व्यक्त करत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आंतरिक मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट आदेश दिले.