शिवसेनेशी फारकत घ्या
By Admin | Updated: July 4, 2014 06:28 IST2014-07-04T04:22:35+5:302014-07-04T06:28:06+5:30
युतीत शिवसेनेला मोठ्या भावाची भूमिका दिली, पण त्यांनी कायम भाजपाची गळचेपी केली. राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री हवा असेल, तर शिवसेनेसोबत फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवा

शिवसेनेशी फारकत घ्या
मुंबई : युतीत शिवसेनेला मोठ्या भावाची भूमिका दिली, पण त्यांनी कायम भाजपाची गळचेपी केली. राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री हवा असेल, तर शिवसेनेसोबत फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवा, असा जोरदार आग्रह पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केला.
अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात आयोजित भाजपा पदाधिकारी संमेलनात राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा सूर लावला. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या राजकीय ठरावाला अनुमोदन देताना मधू चव्हाण, सुरजीतसिंह ठाकूर, वर्षा
भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ज्यांना मोठा भाऊ मानले त्यांनीच कायम आपली गळचेपी केली. भाजपा नेत्यांवर सातत्याने असभ्य भाषेत टीका केली गेली. पण, आता ही भाषा सहन केली जाणार नाही. जशास तसे उत्तर देऊ. नेत्यांनी केवळ निर्णय घ्यावा, राज्यात सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढविण्यास आम्ही सज्ज आहोत, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन दिले. पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेला उपस्थितांमधून जोरदार समर्थन मिळत असताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मवाळ भूमिका घेत शिवसेनेसोबतची २५ वर्षांची सोबत एका दिवसात तोडता येणार नाही, असे स्पष्ट केले. पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा. कोणत्याही प्रकारची गटबाजी होता कामा नये. फक्त भाजपाचा उमेदवार जिंकला पाहिजे असा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. (प्रतिनिधी)