"२ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद..."; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 12:33 IST2025-02-23T12:29:37+5:302025-02-23T12:33:28+5:30
नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

"२ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद..."; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
नवी दिल्ली - सध्या सगळीकडे एकच पंगत राहिली आहे. वेगळ्या पंगती राहिल्यात कुठे..? मला ८-१० वर्षांनी कळलं, सगळ्यांची सगळ्यांसोबत मैत्री आहे. त्यामुळे वेगळ्या पंगतीत जाण्याचा प्रश्न नाही. आपण पंगतीत वेळप्रसंगी वाढणारे झालो, तर आपण समानतेने वाढू. पंगतीप्रपंच करणार नाही हा विचार माझ्या मनात आला असं सांगत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांतरावर भाष्य केले आहे. दिल्लीच्या साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यात त्या बोलत होत्या.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत करणार आहात हे वाटलेच होते. त्यामुळे जर वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेंचं अजून गुणवर्णन करता आले असते. कार्यकर्त्याला कमी समजण्यासारखे कारण नाही. २०१२ पासूनचे शिवाजी पार्कवरील सगळे कार्यक्रम मला आठवतायेत. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचं नियोजन करत होते. आता तपशीलात जात नाही. उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेलं फार आवडलं असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
तसेच बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. दिवसातून दोन तीनदा RT-PCR केली तरी भेटी मिळणार नाही हे आम्हाला माहिती नव्हते. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, मी २००७ पासून आतापर्यंत शिवसेनेची प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. विधान परिषदेत मी काम करायला लागले, तेव्हा आमच्या नेत्याने सभागृहात पिस्तुल आणली होती मग दिवसभर त्यावरच चर्चा व्हायची. एकदा मी भाषणात जय भीम, जय महाराष्ट्र म्हणाले, तेव्हा आमच्या पक्षातील एका नेत्याला ते खटकले. आतापर्यंत इतके आमदार होऊन गेले कुणी जय भीम म्हटलं नाही तुम्ही कसं म्हणाले असं त्यांनी विचारले. मी सार्वजनिक जीवनात कधीही डोळ्यात पाणी येऊ देत नाही. पण त्यावेळी मला खूप वाईट वाटले. एका पेपरला ती बातमी आली. ती बातमी बाळासाहेबांनी वाचली आणि त्यांनी मला बोलवून घेतले. ते म्हणाले तुला जय भीम म्हणायला कुणी अडवले ते मी बघतो. तू खुशाल जय भीम, जय महाराष्ट्र म्हणू शकते. मी शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत शेवटपर्यंत राहणार हे मला सांगायला कमीपणा वाटत नाही असंही नीलम गोऱ्हे यांनी आठवण सांगितली.