Gauri Sambrekar Death: बंगळुरुत महाराष्ट्रातल्या गौरी सांबरेकरची पती राकेश खेडेकरने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत होती. बुधवारीही त्यांच्यात टोकाचं भांडण झालं. भांडणानंतर रागाच्या भरात राकेशने गौरीची चाकूने वार करुन हत्या केली आणि तिचा मृतदेह बॅगेत ठेवून पळ काढला. हत्येनंतर तो मुंबईत येणार होता मात्र पुण्यातून त्याला पोलिसांनी अटक केली. गौरीची हत्या केल्याची माहिती राकेशने त्याच्या वडिलांना दिली होती. मात्र आता दोघांमध्ये त्या दिवशी भांडण का झालं याचं कारण समोर आलं आहे.
सूटकेसमध्ये भरला गौरीचा मृतदेह
राकेश आणि गौरी यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. महिन्याभरापूर्वीच ते बंगळुरुच्या दोड्डा कम्मनहल्ली येथे राहण्यासाठी आले होते. राकेश एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याचं वर्कफ्रॉम होम सुरु होतं. त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. हे भांडण इतकं वाढले की त्यांच्या शेजाऱ्यांनाही त्याचा त्रास होत होता. हत्येआधीही दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका वाढला की रागाच्या भरात राकेशने गौरीच्या पोटात वार केले. त्यानंतर गळा चिरून तिची हत्या केली. हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका मोठ्या ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूममध्ये टाकून पळ काढला.
मामाच्या मुलाशी झालं होतं गौरीचं लग्न; हत्येनंतर आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
वडिलांना दिली गौरीच्या हत्येची माहिती
त्यानंतर राकेशने स्वत: वडिलांना हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर त्यांनी जोगेश्वरी पोलिसांना याची माहिती दिली. जोगेश्वरी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवलं. स्थानिक पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं असताना त्यांना बाथरूममध्ये एक सुटकेस सापडली. फॉरेन्सिक टीमनं सुटकेस उघडली आणि मृतदेह सापडला. महिलेच्या शरीराचे तुकडे करण्यात आले नव्हते पण त्यावर गंभीर जखमांच्या खुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्मसमर्पण करण्यासाठी मुंबईला निघाला पण...
राकेश आणि गौरी हे मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात राहत होते. मात्र कामानिमित्ताने दोघेही बंगळुरुला राहायला गेले होते. गौरीच्या हत्येनंतर राकेशने त्याच्या वडिलांना सगळा प्रकार सांगितला. मी तिला मारलं आहे आणि मी पण जीवंत राहणार नाही. सगळ्यांना सांगा मी असं केलं आहे, असं त्यानं वडिलांना फोनवरुन सांगितले होते. दुसरीकडे राकेश मुंबईला येण्यासाठी खासगी गाडीतून निघाला होता. यादरम्यान त्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे साताऱ्याच्या शिरवजवळ तो बेशुद्ध पडला. स्थानिकांनी याची माहिती दिली असताना पोलिसांनी तो राकेश असल्याचं समजलं. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं.
हत्येच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण
गौरीच्या हत्येमागे कारण तिच्या नोकरीवरून झालेला वाद असल्याचे म्हटलं जात आहे. मास मीडियामध्ये पदवीधर असलेली गौरी मुंबईत काम करत होती. मात्र बंगळुरुत येण्यापूर्वी तिनं नोकरी सोडली होती. बंगळुरूमध्ये काम न मिळाल्याने तिला मुंबईत परत यायचं होते. बुधवारी झालेल्या वादात राकेशने गौरीला कानाखाली मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर गौरीचे चाकू राकेशच्या दिशेनं फेकला. राकेशन तोच चाकू घेतला आणि तिच्या मानेवर तीन वार केले. मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर, तो त्याच्या गाडीनं मुंबईला निघाला. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, त्यानं एका मित्राला गौरीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं.