मुंबई-नाशिक महामार्गावर टँकर उलटल्याने गॅसगळती
By Admin | Updated: May 15, 2016 05:01 IST2016-05-15T05:01:46+5:302016-05-15T05:01:46+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटालगत चिंतामणवाडी गावाजवळ सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटला. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प होती.

मुंबई-नाशिक महामार्गावर टँकर उलटल्याने गॅसगळती
कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटालगत चिंतामणवाडी गावाजवळ सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटला. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प होती. या गॅस टॅँकरमधून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅसगळती सुरू झाली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील तीन ते चार किमीपर्यंतची सर्व हॉटेल्स, ढाबे बंद ठेवण्यात आली. दरम्यान, गळती आटोक्यात आणल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. तरीही या मार्गावरील वाहतूक पुन्हा तासभर ठप्प झाली होती.
मुंबईहून नाशिककडे भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस घेऊन जाणारा टॅँकर भरधाव वेगात कसारा घाटाच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळला. सुरुवातील गॅसगळती होत नसल्याने संबंधित यंत्रणांनी एकेरी वाहतूक सुरू करून गॅसगळती झाल्यास त्यासाठी उपाययोजना करणारी यंत्रणा, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दीड वाजण्याच्या सुमारास अचानक गॅसगळती सुरू झाली. यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक पूर्णत: थांबवून दोन्ही बाजूंकडील तीन ते चार किमी अंतरावरील हॉटेल्स, ढाबे पूर्णत: बंद केले. तसेच काही गावे अंशत: खाली केली. (वार्ताहर)१चिंतामणवाडी गावाजवळच गॅस टँकर उलटला होता. या गावात सुमारे १०० घरांची वस्ती असून, जर गॅसगळती वाढून अपघात झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. गॅसगळती व गावात सुरू असलेल्या चुली यामुळे मोठा प्रसंग ओढवला असता.
२शासकीय यंत्रणेने दाखविलेल्या तत्परतेमुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, अतिदक्षता म्हणून पोलिसांनी लगतची गावे, पाडे, हॉटेल्स, ढाबे यात ज्वलनशील पदार्थ कार्यान्वित करण्यास मनाई केली होती.