गँगस्टरला हलविणार दुसऱ्या तुरुंगात

By Admin | Updated: July 4, 2014 01:08 IST2014-07-04T01:08:17+5:302014-07-04T01:08:17+5:30

नागपुरातील कुख्यात गँगस्टरने नुकतेच कारागृहात स्वत:चा ‘बर्थ डे’ साजरा केला. या प्रकरणाला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करून, गँगस्टरची दुसऱ्या

Gangster moves to another jail | गँगस्टरला हलविणार दुसऱ्या तुरुंगात

गँगस्टरला हलविणार दुसऱ्या तुरुंगात

आर. आर. पाटील : आमदाराचीही चौकशी
नागपूर : नागपुरातील कुख्यात गँगस्टरने नुकतेच कारागृहात स्वत:चा ‘बर्थ डे’ साजरा केला. या प्रकरणाला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करून, गँगस्टरची दुसऱ्या तुरुंगात रवानगी केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय गँगस्टरच्या ‘बर्थ डे’मध्ये सहभागी झालेल्या एका आमदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गृहमंत्र्यांच्या घोषणेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ माजली आहे.
पोलीस मुख्यालयातील पाळणाघराच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. गँगस्टरने तुरुंगात बर्थडे साजरा केल्याच्या वृत्ताने नागपुरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाला गृहमंत्र्यांनी गंभीरतेने घेतले आहे. गँगस्टरच्या बर्थडेमध्ये एक आमदारही सहभागी झाले होते, याची माहिती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहभागी झालेल्या आमदाराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच गँगस्टरला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. गुरुवारी पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्याशी शहर पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर चर्चा केली होती. मात्र दयाल यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कारागृह प्रशासन हा स्वतंत्र विभाग असल्याचे सांगून, त्यावर बोलण्यास नकार दिला.
उपराजधानी आणि राज्यात गुन्हे सातत्याने वाढत आहेत. याबाबत छेडले असता पाटील म्हणाले, दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर देशात सर्वच राज्यात महिलांशीसंबंधित गुन्हे वाढले आहेत. महिलांमध्ये जागरूकता आली असल्याने अशा प्रकरणांची नोंद केली जात आहे. पोलिसही अशी प्रकरणे गंभीरपणे हाताळत आहेत. महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राज्यांपैकी एक आहे. त्यांनी काही आकडे सांगून उपराजधानीत गुन्हे वाढल्याचे अमान्य केले. काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत विचारले असता त्यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगितले. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. चर्चेदरम्यान पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना उपस्थित होते.
राज्यातील गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण आतापर्यंत ८ टक्के होते. यावर्षी मात्र पोलीस, सरकारी वकील आणि न्यायालयाच्या सहाय्याने हे प्रमाण दुपटीवर आले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Gangster moves to another jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.