मीरा-भार्इंदरची धुरा गणेश नाईकांकडे
By Admin | Updated: May 7, 2017 05:46 IST2017-05-07T05:46:45+5:302017-05-07T05:46:45+5:30
मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीची नेतृत्वाअभावी झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नेतृत्वाची

मीरा-भार्इंदरची धुरा गणेश नाईकांकडे
राजू काळे/ लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीची नेतृत्वाअभावी झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नेतृत्वाची दोर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातून बाहेर पडलेल्यांना धडा शिकवण्यासह निष्ठावंतांना येत्या पालिका निवडणुकीत न्याय देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
योग्य व ठोस नेतृत्वाअभावी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीला गळती लागल्याने पक्षातील बरेच निष्ठावंत दुसऱ्या पक्षात विसावू लागले. यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादीमध्ये इतर पक्षांप्रमाणेच गटातटांचे राजकारण सुरू असल्याचे सर्वश्रुत असल्याने माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या गटातील व त्यांचे समर्थक मानले जाणारे बहुतांश नगरसेवक भाजपा-सेनेत स्थिरावले. याचप्रमाणे नाईक यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादीसोबत फारकत घेत सेना-भाजपात जाणे पसंत केले.
पक्षात केवळ काही निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते उरले असतानाच पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील हेही पक्ष सोडून भाजपाच्या तंबूत गेले. यामुळे उरलीसुरली राष्ट्रवादी तळागाळाला जाऊ नये, यासाठी प्रदेशपातळीवरून माजी उपमहापौर जयंत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली. पाटील यांचा पक्षबांधणीचा कार्यक्रम सुरू असतानाच पक्षातील धुसफूस मात्र सुरूच राहिली. ही बाब थेट नाईकांच्या कानी धाडून त्यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची गळ घालण्यात आली. अखेर, ते मान्य करीत नाईकांनी पक्षातील अनिष्टांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ते स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व गिल्बर्ट मेंडोन्सा सध्या कारागृहात आहे. मेंडोन्सा हे आमदारकीच्या निवडणुकीपासून शिवसेनेच्या संपर्कात होते व आजही ते सेनेतच जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. २०१२ मधील निवडणुकीनंतर सुरुवातीला आघाडीच्या सत्तास्थापनेत मेंडोन्सा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, पुढील अडीच वर्षांची सत्ता भाजपाने हिसकावून घेतली. सत्ता मिळवण्यासाठी मेंडोन्सा यांची कन्या तथा माजी महापौर कॅटलिन परेरा या आपल्या वडिलांसोबत सतत सेनेच्या संपर्कात होत्या. यात कॅटलिन यांचा सेनेतील संपर्क दांडगा झाल्याने त्या सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याप्रमाणेच कुटुंबातील इतर काही नगरसेवक सेनेतच जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार?
मागील निवडणुकीत आघाडी न केल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने परस्परांतील मतभेद बाजूला सारून येत्या पालिका निवडणुकीत आघाडी करणे आवश्यक आहे. आघाडीखेरीज पर्याय नसल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. यावरून, येत्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची आघाडी होण्याचे संकेत मिळत असले, तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसकडून अद्याप संकेत मिळालेले नाहीत. निवडणूक जाहीर होताच जागावाटपावर चर्चा होईल. अधिक जागा काँग्रेसला देण्याची तयारी आतापासूनच केल्याचे सांगण्यात येत आहे