प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीनां गोव्याच्या हद्दीवरच अडविणार
By Admin | Updated: August 5, 2016 18:20 IST2016-08-05T18:20:15+5:302016-08-05T18:20:15+5:30
महाराष्ट्र, कर्नाटकातून येणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती गोव्याच्या हद्दीवर चेकनाक्यांवरच अडवून कारवाई केली जाईल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले

प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीनां गोव्याच्या हद्दीवरच अडविणार
- पर्यावरणमंत्र्यांचा इशारा : पेण, महाड येथून मोठ्या प्रमाणात येतात मूर्ती
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ५ : महाराष्ट्र, कर्नाटकातून येणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती गोव्याच्या हद्दीवर चेकनाक्यांवरच अडवून कारवाई केली जाईल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. गोव्यात चतुर्थीच्या काळात पेण, महाड येथून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती येतात.
पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या या मूर्ती गोव्यात येऊत नयेत यासाठी भरारी पथकेही नेमली जातील. मूर्तींना बंदी घालणारी अधिसूचना आधीच काढलेली आहे त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करु, सिंधुदुर्ग किंवा कारवारमधून मूर्ती घेऊन येणारी वाहने प्रवेश करतानाच अडविली जातील, असे आर्लेकर म्हणाले.
आमदार प्रमोद सावंत यांनी शून्य प्रहराला हा विषय उपस्थित केला होता. या मूर्ती पाण्यात विसर्जनानंतर विरघळत नाहीत. कॅल्शियम सल्फेटमुळे असे घडते आणि पर्यावरणाला त्याची बाधा येते त्यामुळे अशा मूर्तींबाबत सरकार गंभीर असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले. कारवाईसाठी अबकारी आयुक्त, वाहतूक संचालक, पोलिस महासंचालक, वाणिज्य कर आयुक्त, पंचायत संचालक , दोन्ही जिल्हाधिकारी, उद्योग संचालक तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांनाही सहभागी करुन घेतलेले आहे.