वसईत पितृपक्षात होतो साखरचौथीचा गणपती उत्सव
By Admin | Updated: September 20, 2016 03:36 IST2016-09-20T03:36:14+5:302016-09-20T03:36:14+5:30
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष. अनंत चतुदर्शीला गणेश विसर्जन झाले की दोन दिवसांनी पितृपक्ष लागतो.

वसईत पितृपक्षात होतो साखरचौथीचा गणपती उत्सव
वसई : भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष. अनंत चतुदर्शीला गणेश विसर्जन झाले की दोन दिवसांनी पितृपक्ष लागतो. भाद्रपदातल्या गणपतींचं विसर्जन झाल की चाहूल लागते ती भाद्रपदातल्याच संकष्टीची - म्हणजेच साखरचौथीची. पुन्हा नव्याने तेच वातावरण अनुभवण्याची. साखरचौथीच्या गणपती प्रथेला लिखित आधार नसला तरी ती वर्षानुवर्षे, परंपरांगत चालत आलेली आहे. कोणतीही पौराणिक कथा किंवा ग्रंथात उल्लेख नसला तरी गणेश हा गणनायक असल्याने त्याच्या स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही.
पितृपक्षातील गणपती पूजनाची प्रथा कोकणातच नव्हे तर पालघर जिल्ह्यातही प्रचलित आहे. गणपती मुख्य कुटुंबात एकच बसवला जातो, त्यामुळे कुटुंबातील मूळ गणपतीची सेवा कुटुंबाला करावी लागते. कुटुंबातील कोणी श्रद्धेने गणेशाकडे काही नवस करतात आणि त्याची पूर्तता झाली की भाद्रपदातल्या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. नवसाचे हे गणपती तीन वर्षे आणेन, पाच वर्षे आणेन असे नवस बोलले जातात पण ज्यांना त्यांचा सहवास कायम हवा असतो ते कायम म्हणजे दर साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. यातही दीड दिवस, पाच दिवस, २१ दिवस असे गणपती आणले जातात.
वर्षातून ही चतुर्थी एकदाच अंगणातील तुळशी जवळ केली जाते हे विशेष. त्यातही जर कुटुंबात कोणी मृत पावले असेल व त्यांचा भरणीश्राद्ध विधी केला गेला असेल तरच ही पूजा अंगणात केली जाते. अजून एक प्रथा म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही वृद्धी किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी ते गणेशभक्त गणपतीची स्थापना करतात. हल्ली तर सणांची हौस म्हणून साखरचौथीचा सार्वजनिक गणपतीही आणला जातो. हा देखील ५ दिवस, १० दिवस अथवा २१ दिवसांचा असतो. (वार्ताहर)
>तांदळाचा गणपती
या स्थापनेमागचा दुसरा उद्देश म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे काही हौशी भक्त मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे आपल्याही घरात गणपती यावा, आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावं या उद्देशाने साखरचौथीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. वसईत ठिकाणी साखरचौथेच्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना जरी केली जात नसली तरी पितृपक्षात येणाया चतुर्थीला सुपारी किंवा तांदळाचा गणपती अंगणातील तुळशी वृंदावना जवळ स्थापित करून मनोभावे पूजा केली जाते.
>जपल्या जातात खास परंपरा
साखरचौथीच्या गणपतीच्या स्थापनेचा विधी गणेश चतुर्थीच्या विधी सारखाच केला जातो. फक्त गणपती बापाचे आवडते मोदक हे साखरेच्या पुरणाचे केले जातात. उंदीरमामाच्या मोदकांची कावड साखर भरुन केली जाते. गणेशचतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी चंद्र पाहिला जात नाही.
काही जण तर चंद्र पहायचा नाही म्हणून घरातूनही बाहेर पडत नाहीत पण साखरचौथीला मात्र पुराण कथेत गणपतीने चंद्राला जो उ:शाप दिला होता तो पाळावा लागतो. त्यामुळे चंद्रोदय झाल्याशिवाय, चंद्र न पाहता बाप्पाला नैवैद्य दाखविला जात नाही.
आधी चंद्राची पूजा केली जाते. आरती करतांना ती मोठ्या परातीत केली जाते. साखरेचे २१ मोदक, ५ दिवे, काकड्यांच्या चकत्या त्यावर केळ, असे ठेवून त्यात झेंडूची देठासकट फुले तुऱ्याप्रमाणे लावतात. केळावरच अगरबत्ती लावली जाते व या ताटाची आरती प्रथम चंद्राला ओवाळून मग गणपतीबाप्पाची आरती केली जाते.