गणेश आगमनाने उत्साह शिगेला
By Admin | Updated: August 15, 2016 03:25 IST2016-08-15T03:25:22+5:302016-08-15T03:25:22+5:30
अवघ्या मराठी मनाला वेड लावणाऱ्या गणेशोत्सवाची मुंबईत धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे.

गणेश आगमनाने उत्साह शिगेला
मुंबई : अवघ्या मराठी मनाला वेड लावणाऱ्या गणेशोत्सवाची मुंबईत धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. ‘आला आला आला, माझा गणराज आला...’ म्हणत मुंबईतील कार्यशाळांमधील गणेशमूर्त्या रविवारी मंडपांच्या दिशेने रवाना झाल्या. लाडक्या बाप्पाची विविध रूपे पाहण्यासाठी रस्त्यांवर भक्तांनी अलोट गर्दी केली होती.
मुंबईतील ‘पहिले पारंपरिक आगमन’ म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या ‘काळाचौकीच्या महागणपती’ने आपले वेगळेपण यंदाही कायम ठेवले. डीजेला दूर ठेवत काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने आगमन सोहळ््यात राज्यातील विविध परंपरांचे दर्शन घडवले. हाती टाळ घेऊन माऊलीचा गजर करणारे वारकरी, नऊवारी साडी नेसलेल्या महिला, कोकणामधील होळीला नाचवणारी पालखी, पारंपरिक मर्दानी खेळ, तलवार बाजी व दानपट्ट्याचे कसब अशा विविध कलाकृतींच्या समावेशामुळे महागणपतीचा आगमन सोहळा खऱ्या अर्थाने महासोहळा वाटत होता. महत्त्वाची बाब म्हणजे नेहमी डीजेच्या तालावर नाचणारी तरूणाईनेही या पारंपरिक सोहळ््याचा आनंद लुटला. बहुतेक तरूण फोटोग्राफर या सोहळ््याची छायाचित्रे टिपताना दिसले. विविध रुपांतील गणेशमूर्त्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी प्रत्येकाच्या हाती कॅमेरा आणि मोबाईल दिसत होते. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दी दाखवण्यासाठी उंच इमारती आणि रस्त्यांमधील दुभाजकांचा ताबा छायाचित्रकारांना घेतला होता. तर तरूणाईला वेड लावणाऱ्या सेल्फीचा मोह गणेश आगमनादरम्यान ओसंडून वाहताना दिसला. मुंबईकरांना सळो की पळो करून सोडणाऱ्या वरूणराजाने मात्र आगमनसोहळ््यात उसंत घेतल्याने मिरवणुकीचा पुरेपूर आनंद गणेशभक्तांना लुटता आला.
>तरूणाईही थिरकली
डीजेला बगल देत गणेशोत्सव मंडळांनी आगमन सोहळ््याला आमंत्रित केलेल्या पुणेरी ढोल, नाशिक बाजा या पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरूणाईनेही ताल धरला. कोळी नृत्य आणि गणपतीच्या जुन्या गाण्यांच्या तालावर तरूण आणि तरूणी भान हरवून नाचत होते. महत्त्वाची बाब म्हणजे कानात ‘बीग बाली’, कपाळावर चंद्रकोर, आणि पारंपरिक कपडे परिधान केलेले तरूण आणि तरूणी बघ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
>वाहतूक पोलिसांचे ढिसाळ नियोजन
दादरच्या दिशेने परळकडे येणाऱ्या वाहतुकीला गणेश मूर्त्यांच्या आगमनाचा फटका बसला. वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परळपासून दादरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परळ आणि दादर उड्डाणपूलावर वाहने खोळंबली होती. नेमक्या कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, याची सूचना वाहनचालकांना मिळत नसल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
>गणेशोत्सव मंडळांची डीजेला बगल
गेल्या काही वर्षांत डीजेच्या तालावर गणेशाचे आगमन करण्याची प्रथा यावेळी मोडीत निघाल्याचे दिसले. जवळपास सर्वच मंडळांनी बाप्पाच्या आगमन सोहळ््यास पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. काळाचौकीचा महागणपतीचे अध्यक्ष नितीन केरकर म्हणाले की, ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘वारसा गणेशोत्सवाचा’ मोहिमेला मंडळाने पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार पारंपरिक वाद्यांना पसंती देत मंडळाने आगमन सोहळा आयोजित केला आहे. या वारसा भविष्यातही जपण्याचा प्रयत्न मंडळ करेल, असेही केरकर यांनी सांगितले.