गणपती चालले गावाला
By Admin | Updated: September 8, 2014 10:21 IST2014-09-08T03:28:06+5:302014-09-08T10:21:55+5:30
श्री गणेशाच्या भक्तिरसात गेले दहा दिवस चिंब झालेल्या मुंबापुरीत सोमवारी आवडत्या बाप्पाच्या निरोपाचा सोहळा रंगणार आहे

गणपती चालले गावाला
मुंबई : श्री गणेशाच्या भक्तिरसात गेले दहा दिवस चिंब झालेल्या मुंबापुरीत सोमवारी आवडत्या बाप्पाच्या निरोपाचा सोहळा रंगणार आहे. वाद्यवृंदाच्या तालावर विसर्जन मिरवणुकांनी आसमंत दुमदुमून निघणार असून, लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना भक्तांच्या डोळ्यांत अश्रू तरळणार आहेत. ‘पुढल्या वर्षी लवकर या...’ असे म्हणत गणेशभक्त ‘चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...’ अशी विनवणीही बाप्पाला करणार आहेत.
भव्य विसर्जन सोहळ््यासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून, मुंबई पोलीस, पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. ४७ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन शांततेत आणि निर्विघ्न पार पडावे यासाठी सर्व सज्जता करण्यात आली आहे.
गेले दहा दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहून भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. गणेशदर्शनासाठी एकत्र आलेल्या गर्दीच्या मुखातून केवळ श्री गणेशाच्या नामाचा गजर केला जात होता. विद्युत रोशणाई, आतशबाजीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात उत्साह आणला होता. मुंबईच्या गल्लीगल्लीत टाळ-मृदंगाच्या नादासह रिमिक्स गाण्यांच्या तालावर गणेश दर्शनासाठी दाखल झालेली तरुणाई फेर धरत होती. गणेशदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांमुळे रस्त्यांवर भक्तीचा महापूर आला होता. घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर गणेशोत्सवाला जत्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते. लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला त्याला निरोप देताना गणेशभक्तांचे कंठ दाटून येणार असून, भक्तिरसाची गर्दी उद्या सर्वच विसर्जन स्थळी दाटून येणार आहे. (प्रतिनिधी)