गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे मुंबईत निधन
By Admin | Updated: June 2, 2014 05:14 IST2014-06-02T05:14:25+5:302014-06-02T05:14:25+5:30
जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने रविवारी दुपारी १२ वाजता बोरीवली येथील राहत्या घरी निधन झाले

गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे मुंबईत निधन
मुंबई : जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने रविवारी दुपारी १२ वाजता बोरीवली येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीताचा आधारवड हरपल्याची भावना शास्त्रीय संगीत क्षेत्रातून व्यक्त झाली आहे. ज्येष्ठ गायक अल्लादिया खाँ यांच्या गायकीने सुरू झालेल्या जयपूर-अत्रौली घराण्याला धोंडूतार्इंच्या गाण्याने आणखी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. धोंडूताई यांचा जन्म २३ जुलै १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हिरवडे गावात झाला होता. त्यांचे वडील गणेश कुलकर्णी हे शिक्षक होते. उस्ताद भुर्जीखान हे त्यांचे पहिले गुरू होत. त्यांनी लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले होते. केसरबाई यांचा एकच शिष्य म्हणजे धोंडूताई, हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. धोंडूतार्इंनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
‘विद्येच्या ज्ञानाला कधीच पूर्णविराम येत नसतो, ती प्रक्रिया अखंडपणे सुरूच असते’, धोंडूताई कुलकर्णी यांनी असे म्हणत संगीताचा रियाझ नेहमीच सुरू ठेवला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी प्रथम आॅल इंडिया रेडिओ, मुंबईवर गाणे सादर केले होते. १९४० ते १९५० या काळात त्या रेडिओची ‘ए ग्रेड’ आर्टिस्ट झाल्या. त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, १९९० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘ढुँढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन... बिंदन तिहारी कोऊ न जाने...’सारख्या बंदिशी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अनवट (अप्रचलित) रागांवर त्यांची पकड होती, हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. धोंडूताई या खूप मोठ्या कलाकार होत्या. गायकीची खानदानी परंपरा त्यांनी जपली. गुरू-शिष्य परंपरेत तयार झालेल्या त्या एकमेव गायिका होत्या. वयाच्या ८० वर्षानंतरही सुरांना आकार लावणे दुर्मीळ होते. त्यांचे गाणे ऐकून मी भारावून गेलो होतो. दुसरे म्हणजे त्या खूप समाधानी होत्या. पैसा, प्रसिद्धी यांच्या मागे त्या कधीही धावल्या नाहीत. एवढी मोठी गायिका महाराष्ट्रात असूनही शासनाने कधी त्यांची दखल घेतली नाही. त्यांचे मोठेपण आपण ओळखले नाही तर ते आपलेच दुर्दैव आहे. गायन क्षेत्रातला एक सूर्यच आज हरपला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक उपेंद्र भट यांनी भावना व्यक्त केल्या. धोंडूताई मोठ्या गायिका होत्या. उस्ताद अल्लारखाँ यांचा सहवास लाभलेल्या काही मोजक्या व्यक्तींपैकी त्या होत्या. आठ वर्षे केसरबार्इंबरोबर तालमीतले गाणे त्या शिकल्या. जयपूर घराण्याची गायकी शेवटपर्यंत जपली. या गायकीला इतरांना हात लावू दिला नाही. त्यांच्याकडे रागदारीचा मोठा संग्रह होता. भारत गायन समाजात त्यांनी आपली कला सादर केली होती. आम्ही त्यांना माणिक वर्मा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला होता, अशी आठवण गायिका शैला दातार यांनी सांगितली.