आयुष्याच्या परीक्षेत गालिब समजत गेला !
By Admin | Updated: December 22, 2014 03:07 IST2014-12-22T03:07:07+5:302014-12-22T03:07:07+5:30
सिद्धहस्त शायर गुलजार यांनी लिहिलेल्या ‘मिर्झा गालिब’ या पुस्तकाच्या अनुवादित आवृत्तीचे रविवारी येथे प्रकाशन झाले.

आयुष्याच्या परीक्षेत गालिब समजत गेला !
शर्मिष्ठा भोसले, औरंगाबाद
सिद्धहस्त शायर गुलजार यांनी लिहिलेल्या ‘मिर्झा गालिब’ या पुस्तकाच्या अनुवादित आवृत्तीचे रविवारी येथे प्रकाशन झाले. अनुवादक अंबरीश मिश्र यांनी गुलजारांना प्रकट मुलाखतीतून बोलते केले. गुलजार यांच्या शब्दस्वरात एकप्रकारे गालिब यांचेच मूर्तिमंत दर्शन झाले.
गालिब तुम्हाला कधी, वयाच्या कुठल्या टप्प्यावर भेटला?
मी उर्दू माध्यमात शिकलो. शाळेत एक मौलवी आम्हाला उर्दू शिकवायचे. मुजीबुर्र रहमान त्यांचं नाव. त्यांनी पहिल्यांदा गालिबशी भेट घडविली. शिकविताना एका तालात ते गझला गायचे आणि गंमत म्हणजे, गालिबला ते ‘चाचा गालिब’ असं संबोधून त्याची शायरी शिकवीत! मोमीनला ते ‘मामू मोमीन’ म्हणाले नाहीत; पण गालिब, जणू घरातल्या बुजुर्ग-बड्या वडीलधाऱ्याप्रमाणं मला खरोखर जवळचा झाला. एक असा बुजुर्ग, ज्याचा धाक आहे; पण तो प्रेमळही आहे. लहान पोरांनी ज्याच्यापाशी हट्ट करावा असा! गालिब पाठ करून आम्ही परीक्षेत मार्क मिळविले. त्यावेळी तो उमगला नव्हता. पुढं आयुष्यानं घेतलेल्या परीक्षा देताना मात्र तो कळत गेला.
आजही गालिब कालसुसंगत आणि महत्त्वाचा वाटतो का?
गालिब कालसुसंगत आहेच. त्याशिवाय का मी त्याचा हात धरून राहिलोय? ‘मैं तो साए की तरह उसपे नजर रक्खे हुए हूँ कबसे!’ तो सामान्यांच्या भाषेत मिसळून गेलाय. जनजीवनाशी एकरूप झालाय. ‘वक्त और सदियों से छनके आये है गालिब के शेर. इसलिये जैसे मुहावरे बन के लोगों के जुबां पे रह गए है.’
‘गालिब’चं समग्र व्यक्तिमत्त्व पाहताना तुम्हाला कुठली गोष्ट सर्वाधिक भावते?
‘शायरी उनका इजहार था. जिंदगी जैसे छुके गई, उन्होने वैसे उसे कागज पर उतारा.’ ते जुगार खेळायचे हे मान्य. ते मद्यपानही करीत. मात्र, मद्य अगदी निर्भेळ, काही न मिसळता मद्य प्यायचे ते. आयुष्यही इतक्या विशुद्ध रूपातच प्राशन केलं त्यांनी!
गालिबनं तुमच्यावर कुठली जबाबदारी टाकली आहे?
मी गालिबचं कर्ज चुकवतोय. येणाऱ्या पिढ्याही नि:संशयपणे ते चुकवत राहतील. आपण जनसामान्य काळासोबत राहायला धडपडतो; पण गालिब होता की काळ त्याला सोबत घेत पुढे सरकत राहिला. उसकी शायरी में वो वक्त का निचोड़ मिलता है.
उर्दू एक संपन्न, श्रीमंत भाषा आहे. उर्दू आणि इतरही भाषांचं अस्तित्व आज धोक्यात आहे का?
आज एका कवीला ऐकायला एवढ्या संख्येनं जमलेले लोकच भाषेच्या सुरक्षित भवितव्याची ग्वाही देत आहेत, असं मी मानतो. उर्दूची नावं अनेक आहेत. रेख्ता, हिंदुस्थानी, हिंदवी. उर्दू फिल्मों की जबान है. कुठल्याही नावानं बोलवा तिला. ती जिवंत आहे, राहील.
जागतिकीकरणाच्या या तडाख्यात भारतासारख्या समृद्ध देशाचा आत्मा एकसंध राहील का?
या बदलाची मलाही काळजी वाटतेच; पण स्थित्यंतरांना पेलून त्यातून नवी उभारी धरणं, बहरणं असं काहीसं यातून व्हायला पाहिजे. जगण्याचा वेग वाढतोय, विविध संस्कृतींचं मिश्रण होत आहे. भाषा आणि संस्कृती या प्रवाही गोष्टी आहेत. त्या कालौघात बदलतीलच. जे चांगलं आहे ते जपलं, सांभाळलं मात्र पाहिजे. पाऊस पडत असेल तर त्याला पडू देत की. तुम्ही फक्त धान्य सुरक्षित ठेवा म्हणजे झालं!
गालिब जे संचित घेऊन लिहिता झाला ती ‘गंगा-जमनी’ संस्कृती दहशतवाद, धर्मांधता यांच्यामुळं लयाला जाते आहे का? हिंसेचा आवाज मोठा होत जातो तेव्हा कवी-कलावंतांची भूमिका काय?
माझा हात लिहिता राहिला, कुणी माझ्या लिखाणाचा अनुवाद केला... अनेकांनी तो वाचला... हेच हवं आहे एकोप्याची संस्कृती टिकवायला. ‘रायटर इज अ रिमाइंडर.’ वादळ येतं तेव्हा काय वाचवायचं, जतन करायचं हे तो सांगतो. दिल्लीतल्या कासीम जान मोहल्ल्यातलं कोळशाचं गोदाम बनू पाहणारं गालिबचं घर वाचवून त्याचं आता संग्रहालय बनविण्यात आलं आहे. दरवर्षी त्याच्या जन्मदिनी तिथं जाऊन मी आवाज देतो, ‘गली कासीम में आकर तुम्हारी द्योढ़ी पर रुक गया हूं मै मिर्झा नौशाद...’