गजाननचा झाला गजमल पुढारी!

By Admin | Updated: May 15, 2016 05:21 IST2016-05-15T05:21:35+5:302016-05-15T05:21:35+5:30

सामान्य शेतकरी, उपसरपंच आणि सरपंच असा प्रवास करीत गजानन उर्फ गजमल लक्ष्मण पाटील हा आरोग्यदूत बनला. मंत्रालयातील ओळखीने त्याला गजमल पुढारी बनविले.

Gajanan khan gajamal leader! | गजाननचा झाला गजमल पुढारी!

गजाननचा झाला गजमल पुढारी!

मुक्ताईनगर (जि.जळगाव) : सामान्य शेतकरी, उपसरपंच आणि सरपंच असा प्रवास करीत गजानन उर्फ गजमल लक्ष्मण पाटील हा आरोग्यदूत बनला. मंत्रालयातील ओळखीने त्याला गजमल पुढारी बनविले. ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाल्याने त्याचे काळे कारनामे समोर आले आहेत.
मेळसांगवे (ता. मुक्ताईनगर) येथील सामान्य शेतकरी असलेला गजाननची परिसरात गजाभाऊ उर्फ गजमल पुढारी म्हणून ओळख आहे. गेल्या वेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तो निवडून आला आणि त्याची उपसरपंचपदी वर्णी लागली. महिला सरपंच पायउतार झाल्याने काही दिवस त्याच्याकडे सरपंचपद होते. १५ वर्षांपूर्वी त्याने गरजू रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करणे व त्यांना मदत करणे ही कामे सुरू केली. हळूहळू आरोग्यदूत म्हणून गजमलची ओळख रूढ झाली. गरजूंना समाजसेवी संस्थाकडून मदत मिळवून देण्याचे काम सुरू झाले, त्यातून त्याचा जनसंपर्क वाढत गेला. चार ते पाच महिन्यांपासून गजमल चारचाकीमध्ये फिरू लागला. या वाहनावर विधिमंडळ इमारतीचे स्टिकर लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहनात आमदार आहेत की काय? असा भास लोकांना होत असतो.
गजमलच्या मुलाचे २८ फेब्रुवारीला लग्न झाले. हळदीच्या कार्यक्रमात शुुद्ध तुपात बनविलेल्या पदार्थांचा समावेश होता, त्याची तालुक्यात मोठी चर्चा झाली होती. शहापूर (म.प्र.) येथे झालेल्या मुुलाच्या लग्न समारंभाला मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. गजमल वापरत असलेले चारचाकी वाहन एका आमदाराने भेट दिल्याची चर्चा परिसरात आहे. (प्रतिनिधी) रामरोटी आश्रमाचाही आधार
गजमल याने बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर पाच वर्ष संचालक म्हणून काम केले आहे. रुग्ण सेवेपाठोपाठ रामभाऊ पुजारी महाराज सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करताना रामरोटी आश्रम तो चालवत आहे. त्यातून आध्यात्मिक कार्याची ओळख त्याने निर्माण केली.
‘ओएसडी’देखील मुक्ताईनगरचे?
३० कोटी लाच मागितल्याप्रकरणातील आरोपी मंत्रालयातील ज्या अधिकाऱ्याकडून काम करवून घेण्याचे सांगत होता, ते ‘ओएसडी’देखील मूळ मुक्ताईनगर येथील असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. विरोधकांचे षड्यंत्र
- एकनाथ खडसे
माझ्या मुंबई किंवा जळगाव येथील कार्यालयामध्ये गजानन पाटील अथवा गजमल पाटील नावाची व्यक्ती अधिकृतपणे अथवा खासगीत कोणत्याही पदावर कार्यरत नाही. त्यामुळे माझ्या नावाचा कोणी गैरवापर करीत असेल व ती व्यक्ती दोषी असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुणे येथे सांगितले.

Web Title: Gajanan khan gajamal leader!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.